सांगली : महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या महापौर संगिता खोत आणि उपमहापौर धीरज सुर्यवंशी आज (20 जानेवारी) पालिकेच्या महासभेत राजीनामा देण्याची शक्यता आहे (BJP order to resign Sangli Mayor). भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खोत आणि सुर्यवंशी यांना याआधीच राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत. दोन्ही पदाधिकाऱ्यांना भाजपने दीड वर्षांसाठी महापौर आणि उपमहापौरपदाची संधी दिली होती. हा कार्यकाळ संपल्याने पक्षाने त्यांना राजीनामा देण्यास सांगितले आहे (BJP order to resign Sangli Mayor).
चंद्रकांत पाटील यांनी स्वतः फोन करुन महापौर खोत आणि उपमहापौर सुर्यवंशी यांना आजच्या महापालिकेच्या महासभेत राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, यावर दोन्ही पदाधिकारी काय निर्णय घेणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे महापौरांनी आणखी काही दिवसांचा कालावधी देण्याची विनंतीही केली, मात्र ही विनंती पक्षाने फेटाळून लावली. त्यामुळे यानंतर खोत आणि सुर्यवंशी काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.
महापौरपदासाठी अडीच वर्षांसाठी ओबीसी (OBC) महिला आरक्षण होते. मात्र भाजपने दीड वर्षातच महापौर बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उर्वरित काळासाठी पुन्हा ओबीसी उमेदवाराचीच वर्णी लागण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सांगली महापालिका निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवला होता. भाजपनं 78 पैकी 41 जागा जिंकल्या होत्या.
सांगली महापालिका पक्षनिहाय आकडेवारी
भाजप – 41
काँग्रेस – 15
राष्ट्रवादी – 20
इतर – 02
एकूण- 78