मुंबई : विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांसह सर्वच पक्ष जोमाने तयारीला लागले आहेत. त्यानुसार नुकतंच भाजपने एका सर्व्हे केला आहे. या सर्व्हेनुसार येत्या विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेनेपेक्षा वरचढ ठरणार असल्याचे म्हटलं जातं आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत भाजप हाच मोठा भाऊ ठरणार असल्याचे या सर्व्हेतून स्पष्ट होत आहे.
सर्व्हेमधील माहितीनुसार, येत्या विधानसभा निवडणुकीत सेना भाजप वेगवेगळे लढल्यास भाजपचे पारडे जड असेल. त्यानुसार भाजपला 288 पैकी 160 जागा मिळतील. तर शिवसेनेला 288 पैकी केवळ 90 जागा मिळतील असा दावा भाजपच्या सर्व्हेत करण्यात आला आहे.
तर दुसरीकडे काँग्रेस राष्ट्रवादी येत्या विधानसभेत एकत्र लढल्यास त्यांना 288 पैकी केवळ 38 जागा मिळतील अशी शक्यता या सर्व्हेत वर्तवण्यात आली आहे.
तसेच जर शिवसेना आणि भाजपची युती विधानसभेत कायम राहिल्यास त्यांना 288 जागांवर विजय मिळू शकतो. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीला 88 जागांवर समाधान मानावे लागेल. त्यामुळे एकंदर आकडेवारी बघता येत्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला आणि काँग्रेसला कमी जागा जागा मिळतील असे चित्र या सर्व्हेवरुन स्पष्ट होत आहे.
त्याशिवाय जर येत्या विधानसभेत शिवसेना आणि भाजप एकत्र लढल्यास आणि काँग्रेस राष्ट्रवादी वेगळी लढल्यास युतीला 230 जागा मिळतील. तर काँग्रेस राष्ट्रवादीला 58 जागांवर मिळतील.
विधानसभा निवडणुकांना अवघे तीन महिने उरले आहेत. त्यातच मुख्यमंत्रीपदाचे लक्ष्य गाठण्याकरिता शिवसेनेने भाजपच्या पावलावर पाऊल ठेवत पक्षविस्तार आणि पक्षबांधणी हाती घेतली आहे. मुख्यमंत्रीपदावरून युतीत तीव्र स्पर्धा सुरु आहे. त्यानुसार आपला मुख्यमंत्री व्हावा यासाठी शिवसेनेने जोरदार तयारी केली आहे. मात्र भाजपने केलेल्या या सर्व्हेमुळे शिवसेनेच्या मुख्यमंत्री पदाच्या इच्छेवर पाणी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.