मुंबई : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मीच पुन्हा मुख्यमंत्री असं जाहीर सांगितल्यानंतर, शिवसेनेत अस्वस्थता पसरली आहे. मुख्यमंत्र्यांच्या (Devendra Fadnavis) विधानानंतर शिवसेना-भाजपमध्ये तणाव वाढला आहे. त्यानंतर आज भाजपची नेता निवडीसाठी (BJP legislature party leader) बैठक होत असून, आज नेता निवडला जाईल. आज दुपारी 1 वाजता ही बैठक (BJP legislature party leader) होत आहे. देवेंद्र फडणवीसच भाजपचे विधानसभा नेते असतील आणि तेच मुख्यमंत्री असतील हेही भाजप श्रेष्ठींनी निश्चित केलं आहे. पण अधिकृतरित्या सर्व औपचारिकता आजच्या बैठकीत पूर्ण केल्या जातील.
भाजपचे 105 आमदार विधिमंडळातील भाजपच्या पक्ष कार्यालयात जमतील आणि देवेंद्र फडणवीस यांना नेता म्हणून निवडतील. काँग्रेसमध्ये सर्वाधिकार हे सोनिया गांधींना देऊन त्यांचा शब्द शेवटचा असायचा, तसा तो भाजपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाहांचा आहे. त्यामुळे हे 105 आमदार आपले सर्वाधिकार अमित शहा यांना देत असल्याचे जाहीर करू शकतात किंवा भाजपचे महाराष्ट्र निवडणूक प्रभारी भुपेंद्र यादव आणि निरीक्षक सरोज पांडे यांच्या अध्यक्षतेखाली 105 आमदार स्वाक्षरी करून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करतील.
त्यानंतर भाजपच्या विधिमंडळ नेत्याची घोषणा होऊन, राज्यपालांकडे अधिकृत स्वाक्षरीसाठी पत्र पाठवले जाईल. भाजप- शिवसेनेचं कोणत्याही तणावाशिवाय सरकार स्थापन होईल अशी स्थिती नाही. गेली 5 वर्ष जी वागणूक भाजप शिवसेनेला देत होत तीच वागणूक निवडणूक निकालानंतर शिवसेना भाजपला देत आहे. त्यामुळे रोज सामनातून भाजपवर जाहीर टीका केली जात आहे.
जोपर्यंत ही टीका बंद होत नाही, तोपर्यंत युतीची चर्चा सुरू करायची नाही यावर भाजपचा एक गट ठाम आहे. त्यामुळेच युतीच्या चर्चेवर सध्या तरी काळे ढग आलेले पाहायला मिळत आहेत. अमित शाह यांचा मुंबई दौराही अद्याप अनिश्चितच आहे. ते मुंबईत आल्यानंतर सेना-भाजपमधील तिढा सुटण्याची चिन्हं आहेत. 2014 मध्ये जसं भाजपला काही अदृष्य हात मदत करून गेले, तसेच काहीसे प्रयत्न पडद्याआड सुरु आहेत की काय अशी शंका राजकीय वर्तुळात सुरु आहे.