गजानन उमाटे, नागपूरः नागपुरातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना जीवे मारण्याची धमकी (Threat) आल्याचं वृत्त आहे. त्यामुळे नितीन गडकरी यांच्या जीवाला धोका असल्याचं सांगण्यात येतंय. या कारणास्तव त्यांच्या घराची तसेच कार्यालयाची सुरक्षा (Security) व्यवस्था वाढवण्यात आली आहे. गडकरी यांच्या नागपूर येथील कार्यालयात लँडलाइन नंबरवर धमकीचे फोन कॉल आल्याची माहिती समोर आली आहे.
विशेष म्हणजे ही धमकी डी गँग अर्थात दाऊदच्या नावाने देण्यात आली आहे. सू्त्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 100 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे.
14 जानेवारी रोजी सकाळी तीन वेळा गडकरी यांच्या नागपूरमधील कार्यालयात धमकीचे फोन आले. त्यामुळे नागपूर पोलीस अलर्ट झाली आहे. सदर कॉल नेमके कुणी केले, यासंदर्भात पोलिसांचा तपास सुरू आहे.
मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील जनसंपर्क कार्यालयाच्या बाहेर चार संपर्क क्रमांक लावण्यात आले आहेत. या नंबर्सवर सकाळपासून तीन वेळा फोन आले आहेत.
सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपास सुरु केला आहे. स्थानिक पोलिसांसह अँटी टेररिझम स्क्वाड अर्थात एटीएसची टीमदेखील नागपुरात दाखल झाली आहे.
26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दहशताद्यांकडून हल्ल्याचा कट असू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे हे प्रकरण अधिक गांभीर्याने घेण्यात आलंय.
आज सकळी नितीन गडकरी यांच्या नागपुरातील ऑरिक सिटी येथील कार्यालयात तीन कॉल आले. साकळी 11 वाजून 29 मिनिटांनी एक कॉल आला. त्यानंतर 11 वाजून 35 मिनिटांनी तर 12 वाजून 32 मिनिटांनी तिसरा कॉल आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.