ऑगस्टपूर्वी मिळणार भाजपला नवीन कार्याध्यक्ष? नड्डा रहाणार सल्लागाराच्या भूमिकेत

| Updated on: Jul 25, 2024 | 11:01 PM

नरेंद्र मोदी सरकार 3.0 मध्ये, जेपी नड्डा यांना आरोग्य मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. नवीन राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठीची निवडणूक जानेवारी 2025 पूर्वी होण्याची शक्यता नाही. अशा स्थितीत पक्षाने कार्याध्यक्ष नेमण्याची तयारी सुरु केली आहे.

ऑगस्टपूर्वी मिळणार भाजपला नवीन कार्याध्यक्ष? नड्डा रहाणार सल्लागाराच्या भूमिकेत
pm modi (23)
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

केंद्रात तिसऱ्यांदा सरकार स्थापन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याकडे नवीन जबाबदारी सोपवली. त्यांना कॅबिनेट मंत्री बनवून आरोग्य मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली. अध्यक्ष जेपी नड्डा यांचा कार्यकाळ संपला आहे. पण, जानेवारी 2025 पूर्वी भाजपच्या नवीन अध्यक्षाची निवड होण्याची शक्यता नाही. त्यामुळे पक्षाने कार्याध्यक्ष नेमण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती सूत्रांनी दिली. येत्या काळात अनेक राज्यामध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यापूर्वीच पक्षाची जबाबदारी सांभाळण्यासाठी पक्षाला पूर्ण मुदतीचा पक्षाध्यक्ष हवा आहे. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नड्डा यांचा कार्यकाळ जून 2024 मध्ये संपणार होता. परंतु, भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत नवीन पक्षप्रमुखाची निवड होईपर्यंत ते या पदावर कायम राहतील असा ठराव मंजूर करण्यात आला होता. नवीन राष्ट्रीय अध्यक्ष निवडीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि भाजपचे सरचिटणीस (संघटन) बीएल संतोष यांच्यासमवेत संसद संकुलात बैठक घेतली. सुमारे दोन तास ही बैठक चालली.

संसद संकुलातील या बैठकीतून संतोष आणि नड्डा निघून गेले. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी अमित शहा यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीमध्ये भाजपच्या पुढील कार्याध्यक्षांच्या नावाची चर्चा करण्यात आली अशी माहिती सूत्रांनी दिली. सर्व राज्यांच्या सरचिटणीसांची दोन दिवसीय बैठक गुरुवारपासून सुरू झाली. या बैठकीमध्ये 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या कामगिरीवर चर्चा केली जाईल. याचवेळी भाजपमध्ये सरचिटणीसांचे (संघटन) महत्त्व लक्षात घेता कार्याध्यक्ष पदाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी कार्यकारी अध्यक्ष आणि नंतर पूर्णवेळ अध्यक्ष होण्याच्या या प्रक्रियेदरम्यान नड्डा सल्लागाराच्या भूमिकेत असतील असेही या सूत्रांनी सांगितले.