पुणे : भाजपचे मावळचे आमदार बाळा भेगडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची एका कार्यक्रमात भेट झाली. दोघांनी एकमेकांच्या कानात गुफ्तगू केल्याचे फोटो व्हायरल झाले आणि एकच चर्चा रंगली. यावर बाळा भेगडेंनी स्पष्टीकरण दिलंय. बारामतीची जागा आम्हीच जिंकू, असं अजित पवारांच्या कानात सांगितल्याचं ते म्हणाले. शिवाय मावळच्या जागेबाबत कोणतीही चर्चा झाली नाही, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.
मावळ येथील काणे फाटा येथे रवी भेगडे यांनी सामुदायिक सोहळ्याचं आयोजन केलं होतं. या सोहळ्याला अजित पवार यांनी हजेरी लावत तेथील स्थानिक आमदार बाळा भेगडे यांच्याशी सात-आठ मिनिटे चर्चा केली. यावेळी युतीचे मावळचे उमेदवार श्रीरंग बारणेही शेजारीच होते. पण अजित पवार यांनी बारणेंशी बोलणं टाळलं. पण बारणेंना सोडून बाळा भेगडेंशी केलेल्या चर्चेमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या.
शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांची भिस्त ही शिवसेनेपेक्षा जास्त भाजपवर अवलंबून आहे. विशेषतः ज्या भागांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाचे प्राबल्य आहे, त्या मतदारसंघातील भाजपच्या आमदारासोबत काय चर्चा केली असा प्रश्न सर्वांना पडला आहे. अजित पवारांचा मुलगा पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहे. यासाठी त्यांनी सर्व ताकद पणाला लावली आहे. मावळचे आमदार बाळा भेगडे हे भाजपचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष असून तब्बल दहा वर्षे ते आमदार आहेत. त्यांचे मावळमध्ये प्राबल्य असल्यामुळे या भेटीविषयी चर्चा होत आहे.
यापूर्वीही भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांची पार्थ पवारांनी भेट घेतली होती. कारण, जगताप आणि बारणे यांचं वैर संपूर्ण मतदारसंघाला माहित होतं. पण निवडणुकीच्या तोंडावर जगताप आणि बारणे यांच्यात दिलजमाई झाली आणि राष्ट्रवादीचं गणित बिघडलं. मावळ मतदारसंघात रायगड जिल्ह्यातील कर्जत, उरण आणि पनवेल हे तीन मतदारसंघ येतात. या भागात भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांचं प्राबल्य आहे. त्यामुळे बारणेंची या तीन मतदारसंघातली भिस्तही भाजपवरच आहे.
व्हिडीओ पाहा :