जळगाव: एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजप आमदार गिरीश महाजन (Girish Mahajan) जळगाव जिल्ह्यात चांगलेच सक्रिय झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते पक्षबांधणीसाठी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी आणि बैठका घेत आहेत. यादरम्यान शुक्रवारी गिरीश महाजन यांना एका अनपेक्षित प्रसंगाला सामोरे जावे लागले. जळगाव येथे शुक्रवारी रात्री भाजपच्या स्थानिक कोअर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर गिरीश महाजन यांनी माध्यमाच्या प्रतिनिधीशी संवाद साधला आणि कार्यालयातून निघून गेले. काही वेळाने गिरीश महाजन हे पुन्हा एकदा भाजप कार्यालयात आले होते. त्यावेळी एका कार्यकर्त्याने त्यांना शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. या कार्यकर्त्याने भाजप पदाधिकाऱ्यांच्या गाड्यांवर दगडही भिरकावल्याचे सांगितले जाते. (BJP leader Girish Mahajan was insulted by party worker in Jalgaon)
या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी येत पाहणी केली. यामधून विशेष काही निष्पन्न झालेले नाही. मात्र, सध्या सोशल मीडियावर यासंदर्भातील एक क्लीप व्हायरल होत आहे. तर दगड भिरकावणारी व्यक्ती भाजप कार्यकर्ता नसून मनोरुग्ण असल्याचा दावा पक्षाकडून करण्यात येत आहे.
भाजपच्या बैठकीला प्रांत संघटक विजय पुराणिक यांच्यासह आमदार गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. बैठक आटोपल्यानंतर काही पदाधिकारी बाहेर येत असतानाच संबंधित व्यक्ती दरवाजातच त्यांच्यासमोर लोळत होता. मात्र, तो मनोरुग्ण असल्याचे सांगत काही अन्य कार्यकर्त्यांनी त्याला बाजूला नेले. त्यानंतर गिरीश महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधला व काही वेळानंतर ते परतले.
तेव्हा या विजय नामक या व्यक्तीने गिरीश महाजन यांना शिवीगाळ करून गाडीकडे एक दगड फेकल्याची माहिती एका ऑडिओ क्लिपमधून समोर आली आहे़. याबाबत पोलिसांनाही माहिती देण्यात आली होती़.पोलीस भाजप कार्यालयात जाऊन आले. मात्र, याबाबत कुठलाही गुन्हा दाखल किंवा नोंद करण्यात आलेली नाही.
संबंधित बातम्या:
भाजपमध्ये अनेकजण आले आणि गेले, आपण पक्ष सोडल्याने अनागोंदी माजणार नाही; महाजनांचा खडसेंना टोला
ताकद दाखवण्यास सुरुवात, भाजपच्या बैठकीपेक्षा खडसेंच्या सत्काराला गर्दी
खडसेंच्या बालेकिल्ल्यातील भाजपच्या पक्षबांधणी बैठकीचा उडाला फज्जा; कार्यकर्त्यांनी फिरवली पाठ
खडसे गेल्याने भाजपाला कोणत्याही प्रकारचा फटका बसणार नाही- गिरीश महाजन
(BJP leader Girish Mahajan was insulted by party worker in Jalgaon)