पुणे : भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrushna Vikhe Patil) आणि पुत्र खासदार सुजय विखे पाटील (MP Sujay Vikhe Patil) यांनी विधानसभेत पक्षविरोधी काम केल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात आहे. यासंदर्भात मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, संघटन मंत्री विजय पुराणिक यांच्या उपस्थितीत उद्या शुक्रवारी (27 डिसेंबर) बैठक होणार आहे. त्यामुळे राधाकृष्ण विखे-पाटील आणि सुजय विखे पाटील यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे (BJPs Meeting About Vikhe father-son).
शुक्रवारी सकाळी दहा ते अकरा या वेळेत ही बैठक पार पडणार आहे. यावेळी विखे पिता-पुत्रांची झाडाझडती होण्याची शक्यता आहे. या बैठकीला माजी मंत्री राम शिंदे, माजी आमदार शिवाजी कर्डिले, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, माजी आमदार वैभव पिचड, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे आणि जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड उपस्थित राहणार आहेत.
यापूर्वीही नाशिक विभागाच्या बैठकीत राम शिंदे यांनी विखे पिता-पुत्रवर आरोप केले होते. अशिष शेलार यांच्या उपस्थितीत या बैठकीत सर्वच पराभूत आमदारांनी विखे यांना लक्ष्य केलं होतं. “पक्षात आलेल्या बड्या नेत्यांमुळे माझ्यासारख्यांचा पराभव झाला,” अशी टीका भाजप नेते राम शिंदे यांनी केली होती. त्यामुळे बैठकीत विखे पिता-पुत्र आणि भाजपातील पराभूत आमदारांच्यात समन्वय साधला जातो की त्यांच्यावर कारवाई केली जाते याकडे सध्या सर्वांच लक्ष लागलं आहे.
याआधीही पंकजा मुंडे, एकनाथ खडसे यांच्यानंतर राम शिंदे यांच्यासह पाच माजी आमदारांनी पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या विरोधात पक्षप्रमुखांकडे तक्रारी केल्या होत्या. राज्यात सत्ता गेल्याने आता भाजपला पक्षातंर्गत नाराजीचा सामना करावा लागत आहे, भाजपमध्ये सध्या अंतर्गत गटबाजी उफाळून आल्याचे पाहायला मिळते. आता यावर पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
BJPs Meeting About Vikhe father-son