मुंबई : राज्य सरकारने दमदाटी करुन, पोलीस बळाचा वापर करुन शेतकऱ्यांची वीज कापली. फसवी कृषी संजिवनी योजना आणली. शेतकऱ्यांकडे 50 टक्के वीज बिल भरायला पैसे नाहीत. शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष असल्याचा दावा माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय. कोणतंही डिस्कनेक्शन न करता शेतकऱ्यांना वीज देता येते, असंही बावनकुळेंनी म्हटलंय. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.(BJP’s jailbharo agitation on February 24, Chandrasekhar Bavankule’s announcement)
राज्य सरकारने अवकाळी आणि गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही. आतापर्यंत फक्त 20 टक्के शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत मिळाल्याचा आरोप बावनकुळेंनी केलाय. त्या पार्श्वभूमीवर भाजप येत्या 23 तारखेपर्यंत आमदार, खासदारांना निवेदन देणार आहे. त्यानंतर 24 तारखेला राज्यातील 287 ठिकाणी जेलभरो आंदोलन होणार असल्याची घोषणाही बावनकुळेंनी केलीय. त्यामुळे वाढीव वीज बिलाविरोधात भाजपनं महावितरणच्या कार्यालयांना टाळे ठोको आंदोलन केलं होतं. त्यानंतर आता जेलभरो आंदोलनाची घोषणा बावनकुळेंनी केली आहे.
राज्य सरकार पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा घणाघाती आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय. संजय राठोड सध्या कुठे आहेत ते कुणाला माहिती नाही. पोलीस महासंचालक प्रेस रिलीज काढत नाहीत. सरकार एरवी ट्वीट करतं पण आता का करत नाही? बेपत्ता झालेला मंत्री कॅबिनेटमध्ये येत नाही, सरकारी निवासस्थानामध्ये नाही, यवतमाळमध्येही नाही. सरकार जाणिवपूर्वक हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहे, असा गंभीर आरोप बावनकुळेंनी केलाय.
पूजा चव्हाण प्रकरणाची चौकशी होणार असून या प्रकरणाचं सत्य बाहेर येईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. मात्र, पूजा चव्हाण प्रकरणाची चौकशी कशा पद्धतीने होणार? कोणत्या यंत्रणेमार्फत होणार? असे सवाल भाजपने मुख्यमंत्र्ंयांना केले आहेत. भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी पूजा चव्हाण प्रकरणी काही प्रश्न उपस्थित करून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्हं उपस्थित केले आहेत. पूजाच्या आत्महत्या प्रकरणी ज्या काही बाबी येत आहेत. त्या सर्वांची योग्य यंत्रणेकडून चौकशी होण्याची गरज आहे. या प्रकरणाचं सत्य बाहेर काढणं ही सरकारची जबाबदारी आहे. मात्र ही जबाबदारी सरकारने अद्याप घेतली नसल्याचं दिसून येतं, असा आरोप भंडारी यांनी केला.
संबंधित बातम्या :
ठाकरे मंत्रिमंडळाची बैठक, संजय राठोड ऑनलाईन हजर राहण्याची चिन्हं
पूजा चव्हाण प्रकरणी मुख्यमंत्री संवेदनशील; केवळ आरोपावरून कारवाई करणं चुकीचं: दीपक केसरकर
BJP’s jailbharo agitation on February 24, Chandrasekhar Bavankule’s announcement