मुंबई : भाजपा-शिंदे गट एकत्र असले तरी दोन्ही गटांमध्ये फोडाफोडीचे राजकारण सुरु आहे. दोन्ही गट एकमेकांचे नेते फोडत आहेत. ही फोडाफोडी थेट हायकमांड पर्यंत पोहचली होती. एकमेकांचे नेते फोडू नका असे आदेशच भाजपाच्या दिग्गज नेत्यांनी दिले होते. मात्र, हा आदेश धुडकावून लावल्याची घडामोड मुंबईत घडली आहे. मुंबईतील भाजपचा महामंत्रीच शिंदे गटाने फोडला आहे.
मुंबई पालिका निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाने भाजपला जबरदस्त धक्का दिला आहे. मुंबईत शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाने भाजपचा महामंत्री फोडला आहे.
भाजपचे उत्तर भारतीय सेलचे महामंत्री राम यादव आणि त्यांच्या पत्नी रेखा यादव यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे शिंदे गटाला उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी उत्तम नेतृत्व मिळाले आहे.
भाजपचे उत्तर भारतीय सेलचे महामंत्री राम यादव आणि त्यांच्या पत्नी रेखा यादव यांचा शिंदे गटातील प्रवेश हा भाजपला मोठा धक्का मानला जात आहे. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थित त्यांनी शिंदे गटात पक्षप्रवेश केला आहे.
भाजप सोडून बाळासाहेबांच्या शिवसेना (शिंदे गट) मध्ये पक्ष प्रवेश केलेल्या राम यादव यांच्या पत्नी रेखा यादव यांनी नाव न घेता आमदार मनीषा चौधरी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
आमची सर्व नेत्यांवर नाराजी आहे, आम्ही महिला नेत्याच्या कार्यालयात जायचो तेव्हा त्यांनी आम्हाला बसू दिले नाही, भेटही दिली नाही असं रेखा यादव म्हणाल्या.
थोडी नाराजी होती. पण, मात्र आता भाजप आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेची युती आहे. महापालिकेत जो उमेदवार दिला जाईल, तो जिंकू, असे राम यादव म्हणाले.
रेखा यादव यांनी प्रभाग क्रमांक 1 मधून अपक्ष नगरसेविकेची निवडणूक लढवली असून राम यादव हे भाजप उत्तर भारतीय मोर्चाचे महामंत्री होते.
भाजपचे उत्तर भारतीय मोर्चाचे महामंत्री राम यादव यांचा शिंदे गटाने महापालिकेत तिकीट देण्याचे आश्वासन दिले असल्याचा दावा आमदार प्रकाश सुर्वे यांनी केला आहे.
राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार अस्तित्वात असले तरी स्थानिक पातळीवर वेगळेच चित्र आहे. शिंदे गटाचे नगरसेवक, कार्यकर्ते, पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. तर भाजपचे अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील होत आहेत.
फोडोफाडीचे रुपांतर संघर्षात होऊ नये यासाठी आता थेट भाजप नेतृत्वानेच यात लक्ष घालून फोडाफोडीचे राजकारण करु नये अशा सुचना दिल्या होत्या. तरीही देखील मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गट आणि भाजपकडून एकमेकांचे नेते गळाला लावण्याचा प्रयत्न सुरु आहे.