मुंबई : खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा (Navneet Rana & Ravi Rana) यांच्यासंदर्भात महत्त्वाची बातमी आहे. रवी राणा यांना मुंबई महानगरपालिकेनं नोटीस (BMC Notice to Ravi Rana) बजावली आहे. रवी राणा यांनी मुंबईतल्या घरात बेकायदेशीर बांधकाम केल्याचा ठपका ठेवत मुंबई पालिकेनं राणा यांना नोटीस बजावली आहे. सध्या नवनीत राणा आणि रवी राणा कोठडीत आहे. मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा म्हणण्याचा इशारा राणा दाम्पत्यानं दिला होता. त्यानंतर राणा विरुद्ध शिवसेना असा संघर्ष मुंबईत पाहायला मिळाला. आता हा संघर्ष अधिक ताणला गेल्याची चर्चा पालिकेनं धाडलेल्या नोटीसीमुळे केली जाते आहे. 4 मे रोजी मुंबई महापालिकेचं पथक खार येथील राणांच्या निवासस्थानी आढावा घेणार आहे. या आढाव्यातून रामा यांच्या घरामध्ये बेकायदेशीर बांधकाम (Illegal Construction) झालंय का, याचा तपास करणार आहे. या तपासातून आता नेमकी काय माहिती समोर येते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Maharashtra | Brihanmumbai Municipal Corporation (BMC) notice on Amravati MP Navneet Rana and MLA Ravi Rana’s house in Khar area of Mumbai on the complaint of illegal construction in the building: BMC
— ANI (@ANI) May 2, 2022
उद्या ( 4 मे) बुधवारी सकाळी 11 वाजेपर्यंत जामीन अर्जावरील निकाल येण्याची शक्यता आहे. न्यायाधीश रोकडे यांचं खंडपीठ हा निर्णय देणार आहे. दरम्यान, शनिवार पासून या निर्णयाचा निकाल प्रलंबित आहे. शनिवारीही वेळेअभावी निकाल राखून ठेवण्यात आला. मंगळवारी पुन्हा एकदा व्यस्त कामकाज आणि वेळेअभावी या प्रकरणाचा निकाल आता दोन दिवस पुढे ढकलण्यात आला. सोमवारी (2 मे) 3 वाजता या प्रकरणाचा निकाल येणं अपेक्षीत होतं, पण न्यायाधीश म्हणाले की 5 वाजता निकाल दिला जाईल.
5 वाजता न्यायाधीश रोडके जेव्हा कोर्टात येऊन बसले तेव्हा त्यांनी निकाल बुधवारी दिला जाईल असं सांगितलं. आज रमजान ईदची सुट्टी आहे आणि कोर्ट बंद असणार आहे. त्यामुळे नियमित कोर्ट बुधावारी सुरु होईल आणि तेव्हाच राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर निकाल येईल. त्यामुळे आता बुधवारपर्यंत राणा दाम्पत्याचा मुक्काम तुरुंगातच असणार आहे.
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी हनुमान चालिसाच्या मुद्द्यावरुन थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच आव्हान दिलं होतं. मातोश्रीबाहेर जाऊन हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. त्यानंतर प्रचंड तणाव वाढलेला. मात्र नंतर त्यांनी माघार घेतलेली. अखेर राणा दाम्पत्याला पोलिसांनी अटक केली आणि आता जामीनासाठी राणा दाम्पत्याचे प्रयत्न सुरु आहेत. अशातच पालिकेनं नोटीस बजावल्यानं राणा दाम्पत्याच्या अडचणी अजून वाढण्याची शक्यता आहे