विनायक डावरुंग, मुंबईः मुंबई महापालिकेवरील (Mumbai Municipal Corporation) शिवसेना (Shivsena) कार्यालयाचा वाद आज आणखीच विकोपाला गेला आहे. कार्यालयातील स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या नावाच्या पाटीला शिवसैनिकांनी लाल शाई फासली. हे नाव मिटवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. कालदेखील ठाकरे गटाने त्यांच्या नावावर चिठ्ठी लावली होती.
काल बीएमसीतील शिवसेना कार्यालयावर दावा ठोकण्यासाठी आलेल्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये यशवंत जाधव, राहुल शेवाळे, शीतल म्हात्रे, नरेश म्हस्के आदींचा समावेश होता. शिवसेना कार्यालय ताब्यात घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
मात्र ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी याला जोरदार विरोध केला. त्यानंतर महापालिका आयुक्तांनी या कार्यालयाला ठाळे ठोकले. आज शिवसेना ठाकरे गटाने आज दुपारपासून महापालिकेत ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली. महापालिकेतील शिवसेना कार्यालय पुन्हा सुरु करण्याची जोरदार मागणी केली.
शिवसेना कार्यालय सुरु होत नाही, तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाहीत, अशी भूमिका ठाकरे गटाने घेतली आहे. महापालिका आयुक्तांना कार्यालयाचे कुलूप उघडावेच लागेल, अशी मागणी जोर धरतेय.
शिंदे गट तसेच महाराष्ट्र सरकारविरोधात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी जोरदार घोषणा देत आज महापालिकेचा हा परिसर दणाणून सोडला. त्यानंतर दुपारी यशवंत जाधव यांच्या नावाच्या पाटीला शाई फासण्यात आली.
यशवंत जाधव यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केलेला आहे. ठाकरे गटात असताना त्यांच्या घरावर आयकर विभागाने धाड टाकली होती. त्यांच्या पत्नी यामिनी जाधव या आमदार आहेत. गुवाहटीत एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांमध्ये यामिनी जाधव यांचाही समावेश होता.
आज ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी यशवंत जाधव यांच्यावर निशाणा साधण्याचा प्रयत्न करत निषेध व्यक्त केला.