महाराजांचे ‘ते’ सोन्याचे सिंहासन परत आणा, राज्यसभेत खासदारांची मोठी मागणी

| Updated on: Jul 25, 2024 | 6:52 PM

संसदेच्या अधिवेशनादरम्यान राज्यसभेमध्ये खासदारांनी एक मोठी मागणी केली आहे. सध्या लंडनच्या ब्रिटिश म्युझियममध्ये असलेले महाराजांचे सिंहासन भारतात परत आणा अशी मागणी या खासदारांनी केली.

महाराजांचे ते सोन्याचे सिंहासन परत आणा, राज्यसभेत खासदारांची मोठी मागणी
maharaj ranjit singh
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

संसदेच्या अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशन दरम्यान राज्यसभेत अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करण्यात आले. यावेळी आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा यांनी ब्रिटनमधून महाराजा रणजित सिंग यांचे 19 व्या शतकातील सुवर्ण सिंहासन परत करण्याची मागणी केली. सोन्याच्या पत्र्याने मढवलेले हे सिंहासन सध्या लंडनमधील एका संग्रहालयात आहे. महाराजा रणजित सिंग यांचे सुवर्ण सिंहासन परत आणण्यासाठी ब्रिटन सरकारशी चर्चा करावी अशी विनंती राघव चढ्ढा यांनी केंद्र सरकारला केली आहे. लंडनमधील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयामध्ये हे सिंहासन ठेवण्यात आले आहे.

महाराजा रणजित सिंह यांच्या महान राजवटीमध्ये संपूर्ण पंजाब एकत्र आले. धर्मनिरपेक्ष मूल्ये, न्याय, समानता, सांस्कृतिक वारसा आणि सुशासन यांना त्यांनी प्रोत्साहन दिले. त्या काळातील प्रसिद्ध सोनार हाफिज मुहम्मद मुलतानी यांनी 1805 ते 1810 या काळात एक भव्य सिंहासन बनवले. युरोपियन रॉयल फर्निचरपेक्षा हे सिंहासन वेगळे आहे. सोन्याच्या जाड पत्राने हे सिंहासन मढवले आहे. सिंहासनाच्या खालच्या भागात कमळाच्या पाकळ्यांची रचना आहे जी पवित्रतेचे प्रतीक आहे. महाराजांच्या दरबारातील वैभवाचे हे सिंहासन प्रतीक होते, असे खासदार राघव चढ्ढा यांनी सांगितले.

महाराजा रणजित सिंह यांचा वारसा आणि त्यांच्या इतिहासातील योगदानाचा समावेश शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये करण्यात यावा. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्याबद्दल अधिक माहिती मिळावी असे सांगून ते पुढे म्हणाले, 1849 मध्ये इंग्रजांनी पंजाब ताब्यात घेतला. त्यावेळी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने हे सिंहासन ताब्यात घेतले. लीडेनहॉल स्ट्रीटवरील ईस्ट इंडिया कंपनीच्या संग्रहालयात प्रदर्शित करण्यासाठी हे सिंहासन लंडनला पाठवण्यात आले. तर, दागिने, चांदीचे फर्निचर आणि शस्त्रास्त्रांसह इतर वस्तूंचा लिलाव लाहोरमध्ये करण्यात आला होता. 1879 मध्ये संग्रहालयातील संग्रहाच्या विभाजनानंतर हे सिंहासन दक्षिण केन्सिंग्टन संग्रहालयाकडे पाठविण्यात आले. तेच आता व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालय म्हणून ओळखले जाते अशी माहितीही त्यांनी दिली.

कोण होते महाराजा रणजित सिंह?

महाराजा रणजीत सिंह हे पंजाबचे सर्वात प्रमुख राजा होते. 13 नोव्हेंबर 1780 रोजी त्यांचा जन्म झाला. रणजीत सिंह यांनी केवळ पंजाबच बांधला नाही तर इंग्रजांविरुद्ध दीर्घकाळ लढा दिला होता. मौल्यवान हिरा कोहिनूर हे महाराजा रणजित सिंग यांच्या खजिन्याचे वैशिष्ट्य होते. 1839 मध्ये महाराजा रणजीत सिंह यांचे निधन झाले. त्यांची समाधी लाहोरमध्ये बांधण्यात आली. त्याच्या मृत्यूनंतर इंग्रजांनी पंजाबवर आपली पकड घट्ट करण्यास सुरुवात केली. अँग्लो शीख युद्धानंतर 30 मार्च 1849 रोजी पंजाब ब्रिटिश साम्राज्याचा एक भाग बनला आणि कोहिनूर हिरा राणी व्हिक्टोरियाला सादर करण्यात आला.