मुंबई : 2024 ची निवडणूक काही महिन्यांवर आहे. महाराष्ट्रातील सगळ्याच राजकीय पक्षांनी 2024 च्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अशात एक नवा राजकीय पक्ष राज्याच्या राजकारणात पाय रोऊन उभं राहण्यासाठी प्रयत्नशील आहे. BRS पक्षाने महाराष्ट्राच्या राजकारणात एन्ट्री केली आहे. या पक्षात अनेकांनी प्रवेश केला आहे. तर काहींचा पक्षप्रवेश येत्या काळात होणार आहे. पण BRS पक्षाचा महाराष्ट्राच्या राजकारणात विस्तार होतोय. BRS च्या महाराष्ट्र विस्ताराचा राजकीय अर्थ काय? पाहुयात…
महाराष्ट्रात भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना-ठाकरे गट हे पाच प्रमुख राजकीय पक्ष आहेत. तसंच इतरही काही प्रादेशिक पक्ष सक्रीय आहेत. अशातच BRS च्या एन्ट्रीने जनतेसाठी एक नव्या पक्षाचा पर्याय समोर असेल अन् राजकीय पक्षांसाठी मात्र आणखी एक स्पर्धक…
आणखी एक पक्ष राज्याच्या राजकारणात सक्रीय झाल्याने याचा परिणाम सहाजिकपणे निवडणुकांवर होणार आहे. निवडणुकांमध्ये मतांचं विभाजन होणार हे निश्चित आहे.
केसीआर यांनी नांदेडमधून राज्याच्या राजकारणात एन्ट्री केली आहे. BRS कडून करण्यात येणाऱ्या जाहिराती आणि त्यांच्या भाषणातील मुद्दे पाहता BRS च्या एन्ट्रीने राज्यातील दलित मतांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता दाट आहे.
ज्या लोकांना राजकारणात यायचं आहे. नव्या संधीच्या शोधात आहेत. अशा लोकांसाठी विशेषत: तरूणांसाठी राजकारणात एन्ट्री करण्यासाठी मोठी संधी असेल. त्यामुळे तरूण वर्ग या पक्षाकडे आकर्षित होण्याची शक्यता अधिक आहे.
महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता सगळ्याच पक्षात कुणाची ना कुणाची नाराजी पाहायला मिळते. काम करण्याची संधी मिळत नाही, असं म्हणत राज्यात पक्षांतर होत आहेत. अशा या सगळ्याच पक्षातील नाराज नेत्यासाठी ही संधी असेल. त्यामुळे या राजकीय नेत्यांना आपलं राजकीय पुनर्वसन करण्याची मोठी संधी या निमित्ताने मिळणार आहे.