लखनऊ: लोकसभा 2019 निवडणुकीसाठी देशभारतील विविध पक्षांची मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. उत्तर प्रदेशातील कट्टर विरोधक मायावती आणि अखिलेश यादव हे दोघेही एकत्र आले आहेत. अखिलेश यांचा समाजवादी पक्ष आणि मायावती यांचा बहुजन समाज पक्षाने युतीची घोषणा केली. दोघांनीही आज संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आगामी निवडणुकीचं रणशिंग फुंकलं.
मायावती म्हणाल्या, “ही पत्रकार परिषद मोदी-शाह या गुरु चेल्याची झोप उडवणारी आहे. भाजपकडून जनतेची दिशाभूल झाली. हुकूमशाही सरकारकडून शेतकऱ्यांसह सर्वांचंच नुकसान झालं. लोकभावना म्हणून सपा-बसपा एकत्र येत आहे. आगामी लोकसभा निवडणूक सपा-बसपा एकत्र लढेल”
याशिवाय मायावतींनी राफेल घोटाळ्यामुळे भाजपची सत्ता जाणार असं भाकीत वर्तवलं. यावेळी मायावतींनी भाजपसह काँग्रेसवरही टीकास्त्र सोडलं. काँग्रेस आणि भाजप दोघेही एकाच माळेचे मणी आहेत. दोघांनीही भ्रष्टाचार केला. काँग्रेसने घोषित आणीबाणी लादली तर भाजपकडून अघोषित आणीबाणी सुरु आहे असं मायावती म्हणाल्या.
भाजप आणि काँग्रेसमध्ये कोणताही फरक नाही. काँग्रेसचं बोफोर्स घोटाळा प्रकरण आहे तर भाजपचा राफेल घोटाळा आहे. दोन्ही सरकारमध्ये संरक्षण विभागात मोठा घोटाळा झाला असं मायावती म्हणाल्या.
काँग्रेस-भाजप दोघांच्याही काळात महागाई, भ्रष्टाचार, गरिबी वाढली असा आरोप मायावतींनी केला.
उत्तर प्रदेशातील लोकसभा मतदारसंघ
उत्तर प्रदेश हे देशातील सर्वात मोठं राज्य आहे. इथे लोकसभेच्या सर्वाधिक 80 जागा आहेत. गेल्या 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने यूपीमध्ये तब्बल 72 जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे यंदा सपा-बसपाने एकत्र येत भाजपला रोखण्याचं ठरवलं आहे.
38-38 जागा लढवणार
आगामी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सपा आणि बसपा दोघेही 38-38 जागा लढवणार आहेत. तर इतर पक्षांना 4 जागा सोडणार आहेत. त्यापैकी अमेठी आणि रायबरेली या जागा अन्य पक्षांना सोडण्यात येतील.