बुलढाणा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर प्रथमच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा वाढदिवस (Uddhav Thackeray Birthday) बुलडाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रभर साजरा झाला. जिल्ह्याचे संपर्कप्रमुख खासदार प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांच्यासह दोन आमदार शिंदे गटात गेले असताना ‘प्रताप गडावर मात्र खासदार जाधव यांचे धाकटेबंधू, माजी नगराध्यक्ष संजय जाधव (Sanjay Jadhav) यांनी उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस सगळीकडे फलक लाऊन आणि वृत्तपत्रात जाहिरात देऊन धुमधडाक्यात साजरा केलाय… हे फलक म्हणजे अभेद्य ‘प्रताप’ गडाला हादरा समजायचा की, गनिमी कावा खेळून दोन्ही सेना आपल्या कुटुंबात ठेऊन ही राजकीय खेळी तर नाही ना?, अशी चर्चा आता राजकीय गोटात रंगू लागलीय किंवा संजय जाधव यांनी खासदार बंधू यांच्याविरोधात दंड थोपटले तर नाही ?, अशीही चर्चा रंगू लागली आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील दोन शिवसेनेचे आमदार शिंदे गटात सामील झाल्यानंतर, त्या पाठोपाठ 12 खासदारांनी देखील शिंदे गटात समावेश केला. त्यामध्ये देखील बुलडाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव हे अग्रस्थानी होते. त्यानंतर मात्र बुलडाणा जिल्ह्यात शिवसेनेला मोठे भगदाड पडणार असा अंदाज वर्तवण्यात येत होता, त्या नंतर काही दिवसातच घाटाखालील एका शिवसेना जिल्हाप्रमुखाने पत्रकार परिषद घेऊन आम्ही पदाधिकारी आणि शिवसैनिक खासदार प्रतापराव जाधव यांच्यासोबत शिंदे गटात असल्याचे जाहीर केले होते. परंतु काही दिवसातच इतर पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन आम्ही उद्धव ठाकरे सोबतच आहे, आणि त्यांच्या सोबत राहणार असल्याचे स्पष्ट केल्याने शिंदे गटातील पदाधिकारी तोंडघशी पडले होते.
खासदार प्रतापराव जाधव यांनी मेहकर, चिखली, सिंदखेड राजा या ठिकाणी बैठक घेऊन आपली भूमिका स्पष्ट करून, शिवसैनिकांची समजूत काढण्याचाही प्रयत्न केल्याचे दिसून आले. मात्र नुकताच उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस झाल्याने त्यांना सर्व स्तरातून शुभेच्छा देण्यात आल्या, त्यामध्ये मेहकरचे शिवसेनेचे दोन वेळ नगराध्यक्ष राहिलेले आणि खासदार प्रतापराव जाधव यांचे धाकटे बंधू संजय जाधव यांनी उद्धव ठाकरे यांना एका वृत्तपत्राच्या माध्यमातून आणि शहरात फलक लावून शुभेच्छा दिल्या आहेत, या जाहिरातीमध्ये जिल्हा शिवसेनाप्रमुख बळीराम मापारी यांचाही फोटो होता, त्यामुळे खासदाराचे बंधूच त्यांच्यासोबत नसल्याने संजय जाधव यांनी प्रतापराव जाधव यांना घरचा आहेर दिल्याची जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे.
संजय जाधव यांनी लावलेले फलक पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या असून राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लावल्या जात आहेत.. मोठे बंधू खासदार प्रतापराव जाधव यांच्या भूमिकेशी फारकत घेऊन संजय जाधव हे उद्धव ठाकरे सोबत जाणे म्हणजे प्रताप गडाला खरंच हादरा म्हणायचं की खासदारांची राजकीय खेळी. धाकटे बंधू सोबत त्यांच्या जवळचे नातेवाईक बळीराम मापारी सुद्धा आहेत हे विशेष…