बुलढाणा | 01 ऑगस्ट 2023 : देशातील प्रमुख विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची मुंबईत बैठक होतेय. या बैठकीला देशभरातील प्रमुख विरोधी पक्षांचे नेते मुंबईत आहेत. या बैठकीचा आज दुसरा दिवस आहे. या बैठकीवर शिवसेना शिंदे गट आणि भाजपकडून टीका करण्यात येत आहे. कितीही विरोधी पक्ष एकत्र आले तरीही ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सामना करू शकणार नाहीत. कितीही जनावरे एकत्र आली तर वाघाची शिकार करू शकत नाहीत!, असं म्हणत शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी इंडियाच्या बैठकीवर निशाणा साधला आहे.
कितीही विरोधक एकत्र आले. बैठका केल्या तरी ते मनाने हरलेले आहेत. शरीराने थकलेले आहेत. आघाडी होण्याअगोदरच पंतप्रधानपदासाठी अनेकांची नावं येत आहेत. यांच्यामध्ये आजच 15 नवरे झालेले आहेत. त्यामुळे यांचा काय मेळ बसेल?, हे साऱ्या जगाला कळतंय. यापूर्वी सुद्धा देवेगौडा, चंद्रशेखर सारख्या 17 पक्ष एकत्र आले होते, त्यावेळी चार चार महिन्यात निवडणुका झाल्या. पण आम्हाला विश्वास आहे. शंभर टक्के 350 पेक्षा जास्त जागा महायुतीच्या निवडून येतील आणि नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील. त्यात कोणताही फरक पडणार नाही, असंही संजय गायकवाड म्हणाले.
संजय राऊत यांनी काल माध्यमांशी बोलताना काँग्रेस राहुल गांधी निर्विवाद नेतृत्व आहे. त्यांचं नेतृत्व सर्वांना मान्य आहे. त्यांना देशभरातील लोकांचं समर्थन आहे. त्यामुळे इंडियाला हरवणं आता शक्य नाही, असं म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्याला शिंदेगटाकडून खोचक टोला लगावण्यात आला आहे.
हेच नेतृत्व मागेही होतं. त्याला जनतेने धूळ चारली. त्यांचा एकच खासदार आला होता. हे संजय त्यांचे प्रगल्भ नेतृत्व आहे. त्यांनी भारत जोडा यात्रा काढली. त्यामधे सगळं उलटं झालं. प्रगल्भ नेतृत्व आहे. ते मग आघाडीची बैठक कशाला घेता? राहुल गांधी आमचे नेते आहेत म्हणून घोषणा करा! संजय राऊतांची किंमत तरी काय काँग्रेसकडे?, असं संजय गायकवाड म्हणालेत.
उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारच्या शासन आपल्यादारी या कार्यक्रमावर टीका केली आहे. त्याला उत्तर देताना उद्धव ठाकरेंना खोडी केल्याशिवाय दुसरा धंदा नाही. अडीच वर्ष घरात बसून होते, तुम्ही लाभार्थ्यांना काय दिले? शेतकऱ्यांना काय दिलं? किमान आम्ही देतो याचं कौतुक तरी करा. तुम्ही तर काहीही देऊ शकले नाहीत. एकदा व्यासपीठावर येऊन बसा, आम्ही थापा मारतोय का पाहा, असा टोला संजय गायकवाड म्हणालेत.