मुंबई : महाराष्ट्र हे मॅग्नेटिक राज्य आहे. उद्योजकांना आजही राज्याचे आकर्षण कायम आहे. राज्यातील कोणतेही उद्योग बाहेर जाणार नाहीत तर इतर राज्यातील उद्योजकही महाराष्ट्रात उद्योगासाठी येतील, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. इंडियन मर्चंट चेंबर ऑफ कॉमर्स यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. (businessman should become brand ambassadors Says Cm Uddhav thackeray)
व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमाला उद्योगमंत्री सुभाष देसाई, आयएमसीचे अध्यक्ष राजीव पोद्दार यांच्यासह इतर उद्योजक उपस्थित होते. यावेळी ‘मिशन एंगेज’ या पुस्तिकेचे तसेच डिजिटल आर्ट या डिजिटल प्लॅटफॉर्मचे अनावरण करण्यात आले.
“मॅग्नेटिक महाराष्ट्रासाठी इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स पुढाकार घेत आहे, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. मॅग्नेटिक या शब्दात मोठी ताकद आहे. महाराष्ट्राला एक इतिहास आहे. महाराष्ट्र एक सर्वार्थाने वेगळे राज्य आहे. इथे वेगळे संस्कार आहेत. त्यामुळे येथे येऊन कुणी काही घेऊन जाऊ शकत नाही. स्पर्धेला आम्ही घाबरत नाही. पण कुणी ओढून ताणून येथून काही घेऊन जाणार असेल, तर शक्य होणार नाही”, असं मुख्यमंत्री म्हणाले.
“महाराष्ट्रात नवीन गुंतवणूक येत आहे. इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स महाराष्ट्रातील या बदलाचे 113 वर्षे जुने साक्षीदार आहे. त्यामुळेच तुम्हीच महाराष्ट्राचे ब्रॅंड अम्बॅसिडर आहात. महाराष्ट्राच्या यशाची गाथा, गोष्टी तुम्हीच इतरांना सांगू शकता. कुठलीही अडचण असेल, तर ती दूर करण्यात सरकार तुमच्यासोबत असते. हे तुम्हाला सांगता येईल. यामुळे महाराष्ट्रात देशभरातून नव्हे परदेशातून येणाऱ्या गुंतवणुकीलाही प्रोत्साहन मिळेल. यासाठी तुम्ही महाराष्ट्राचे दूत व्हावे”, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.
“इंडियन चेंबर ऑफ कॉमर्ससोबत जुने स्नेहबंध आहेत. यापूर्वी मुंबई आणि महाराष्ट्राचे व्हिजन काय असेल, याबाबत आपण चर्चा करत असू. पण आता हे स्वप्न आपल्याला सत्यात आणण्याची संधी मिळाली आहे. संस्थेने स्वातंत्र्याच्या आधीचा काळही बघितला आहे. आता युग बदलले आहे. देशही बदलला आहे. देश विकासाच्या दिशेने पुढे जात आहे आणि याबरोबरच आपले नाते अधिक घट्ट झाले आहे”, अशा आठवणींना मुख्यमंत्र्यांनी उजाळा दिला.
कोव्हिडचे संकट अजूनही संपलेले नाही. पण या संकटातही पुढे कसे जायचे याचा आपण मार्ग शोधतो आहोत. चेंबरशी संलग्न आपण सर्व हे महाराष्ट्राच्या परिवाराचा भाग आहात. त्यामुळे परिवारातील आपल्या दोघांचेही उद्दिष्ट एक आहे. यातून आपल्याला राज्याला पुढे न्यायचे आहे, असं ते म्हणाले.
अडचणीचा काळ सुरु आहे. पण या काळात नोटबंदीत जसा पैसा गायब झाला, तसा गायब झाला नाही. आता चक्र फिरू लागले आहे. त्यामुळे आता आत्मविश्वासाने पुढे जाऊया. त्यासाठी आम्ही ईझ ऑफ डूईंग बिझनेस सारख्या संकल्पना राबवित आहोत. त्यामध्ये तुम्हा उद्योजकांकडून आणखी सूचना याव्यात. नवीन काही करू शकतो का, त्याबाबत संकल्पना मांडण्यात याव्यात, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
(businessman should become brand ambassadors Says Cm Uddhav thackeray)
संबंधित बातम्या
एकही उद्योग राज्याबाहेर जाऊ देणार नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
तरुणांनो उद्योग-धंद्याकडे वळा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं आवाहन