अहमदनगर : “सुजय विखे हे भाजपचे खासदार आहेत. त्यामुळे मंत्रालयात काय शिजतंय हे त्यांनी स्पष्ट करावं,” असा टोला राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी लगावला आहे. अहमदनगरमधील लष्कराच्या के. के. रेंज विस्तारीकरणावरुन एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाची मालिका सुरु झाली आहे. त्यावरुनच प्राजक्त तनपुरे यांनी सुजय विखेंवर टीका केली आहे. (Prajakt Tanpure Criticizes sujay vikhe patil on K K Range land acquisition)
“आम्ही जमीन अधिग्रहण करणार नाही, असे संरक्षण खात्याच्या प्रतिनिधींनी येऊन सांगितलं आहे. त्यामुळे संभ्रम निर्माण होण्याचं कारण नाही. याबाबत कोण काय बोलतं यात मला देणेघेणे नाही. जी काही वस्तूस्थिती आहे ती मी तुम्हाला सांगितली आहे. जर यात अजून काही असेल तर सुजय विखे हे भाजपचे खासदार आहेत. त्यामुळे मंत्रालयात काय शिजतंय हे त्यांनी स्पष्ट करावं,” अशी प्रतिक्रिया प्राजक्त तनपुरे यांनी दिली.
गेल्या काही दिवसांपासून अहमदनगरमधील लष्कराच्या के. के. रेंज विस्तारीकरणावरुन राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. त्यावरुन एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत.
अहमदनगरमधील के. के. रेंज विस्तारीकरण होणार नसल्याचे संरक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांनी अधिकृतपणे जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन सांगितलं आहे. त्यामुळे के. के. रेंज विस्तारीकरणाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार खरं बोलतात की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निवडणुकीपूर्वी कळेल, असे वक्तव्य खासदार सुजय विखे यांनी केलं होतं. त्यामुळे के. के रेंजच्या विस्तारीकरणावरुन संभ्रम निर्माण झाला होता. यावर तनपुरे यांनी विखेंना सडेतोड उत्तर दिलं आहे.
“के के रेंज संदर्भात विस्तारीकरण होणार की नाही हे निवडणुकीआधी कळेल. त्यामुळे पवार साहेबांवर विश्वास ठेवायचा का मोदी साहेबांवर? याचा निर्णय जनतेने घ्यायचा आहे”, असं भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी केलं होतं. त्यामुळे स्थानिकांच्या मनात संभ्रम वाढला होता. के के रेंज विस्तारीकरणासाठी जमीन अधिग्रहण होणार की नाही? असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे.
“राज्यात लोकनियुक्त सरकार नाही तर षडयंत्र सरकार आहे. या षडयंत्र सरकारकडून सर्वसामान्य माणसाला चांगले दिवस मिळतील, असं मला वाटत नाही”, असा घणाघात सुजय विखे पाटील यांनी त्यावेळी केला होता.
“राज्य सरकारमुळे भ्रमनिरास झाला आहे. महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष होत आलं आहे. त्यांच्या या वर्षाच्या कामकाजाकडे पाहिले तर कुठल्याही प्रकारचे नियोजन नाही. फक्त पत्रकार परिषदा, प्रवेश प्रक्रिया, घोषणाबाजी, नारळ फोडणे, फोटो काढणे एवढेच या सरकारचे काम आहे”, असा टोला सुजय विखेंनी लगावला होता. (Prajakt Tanpure Criticizes sujay vikhe patil on K K Range land acquisition)
संबंधित बातम्या :
नगरमध्ये के के रेंज विस्तारीकरणाच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलं, सुजय विखेंचा राज्य सरकारवर निशाणा
संरक्षणमंत्री झाल्याशिवाय नगर जिल्ह्याचे प्रश्न सुटणार नाहीत; सुजय विखेंची टोलेबाजी