बुलढाणा : बंड पुकारलेल्या राज्यातील शिवसेना आमदारांमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील दोन आमदारांचा समावेश आहे. यामध्ये मेहकर मतदार संघाचे आमदार संजय रायमुलकर (Sanjay Raimulkar) यांचा समावेश आहे. रायमुलकर हे शिवसेनेशी बंडखोरी करत शिंदे गटात सहभागी झाले आहेत. यामुळे नाराज झालेल्या जिल्ह्यातील एका शिवसैनिकाने रायमुलकर यांना फोन करुन बंडखोरीबाबत जाब विचारला. यावर रायमुलकर यांनी त्या शिवसैनिकाला खडसावले आहे. तुम्ही माझ्या चौकशा करायच्या नाही, अशा शब्दात उत्तर दिले आहे. ही ऑडिओ क्लिप (Audio Clip) सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल (Viral) होत आहे.
संजय रायमुलकर हे मेहकर विधानसभा मतदार संघाचे नेतृत्व करतात. शिवसेनेतून बंडखोरी करुन ते एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. त्यांना शिवसेनेचे माजी आमदार शशिकांत खेडेकर यांच्या सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघातील एका शिवसैनिकाने कॉल करून बंड करण्याचे कारण विचारले. यावेळी मात्र आमदार संजय रायमुलकर चिडले आणि माझ्या चौकशा करायच्या नाही, आम्ही काय फक्त मेहकर ते मुंबई चकरा मारायला आमदार झालोत का..? आम्हाला निधी मिळत नाही आणि सरकार उद्धव ठाकरे नव्हे तर अजित पवार चालवतात, असे त्यांनी यावेळी म्हटले. पुढे बोलताना ते म्हणाले की, तुम्हाला काय बोलायचे ते माजी आमदार शशिकांत खेडेकर यांच्याशी बोला आणि कॉल कट केला. हा कार्यकर्ता कोण आहे हे अद्याप समोर आलेले नसून, ही अर्धवट रेकॉर्डिंग सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.