रत्नागिरी : मराठी कामगारांच्या रोजगाराशी संबंधित असलेलं ‘खंबाटा एव्हिएशन’ प्रकरण शिवसेनेचे विद्यमान खासदार विनायक राऊत यांना भोवणार असल्याची चिन्हं आहेत. कारण ‘खंबाटा एव्हिएशन’ बंद झाल्यानंतर देशोधडीला लागलेले कोकणातील जवळपास 70 टक्के कामगार आता खासदार विनायक राऊत यांच्या विरोधात उभे झाले आहेत. हे कामगार कोकणात विनायक राऊत यांच्या विरोधात घरोघरी जाऊन प्रचार करणार आहेत. त्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीला एक वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गात शिवसेनेकडून खासदार विनायक राऊत, आघाडीकडून काँग्रेसचे नवीनचंद्र बांदिवडेकर आणि वंचित बहूजन आघाडीचे मारुती रामचंद्र जोशी अशी तिहेरी लढत होणार आहे. त्यातच आता या कामगारांनी राऊतांविरोधात एल्गार पुकारल्याने रत्नागिरी-सिंधुदुर्गात शिवसेनेची डोकेदुखी वाढणार आहे.
‘मराठी माणसांच्या न्याय, हक्कांसाठी फक्त शिवसेना’, असं गळा काढणारी शिवसेना पुन्हा एकदा याच मुद्यावरुन वादात सापडली आहे. हा वाद निवडणुकीत शिवसेनेला भोवणार अशी चिन्हं आहेत. मुंबईतल्या आंतराष्ट्रीय विमानतळावर ग्राऊंड हँडलिंगचं काम करणाऱ्या या कंपनीत 2,763 कामगार होते. यातील जवळपास 70 टक्के कामगार हे मराठी आणि विशेषतः कोकणातील आहेत. खंबाटा एव्हिएशनमध्ये भारतीय कामगार सेना ही मान्यतापात्र युनियन होती. त्या युनिटची जबाबदारी खासदार विनायक राऊत यांच्यावर होती. मात्र, अडीच वर्षांपूर्वी ही कंपनी बंद पडली. यातील कामगारांना वर्ष-वर्ष पगार मिळालेले नाहीत. आता या कंपनीतील कामगार देषोधडीला लागले आहेत. ही कंपनी बंद पडण्यामागे खासदार विनायक राऊत हेच जबाबदार असल्याचा आरोप खंबाटा एव्हिएशन कंपनीतील कामगारांनी केला. रत्नागिरीत पत्रकार परिषद घेत त्यांनी हा आरोप केला.
या कंपनीतील कामगार सेनेच्या युनियमधील युनिटची जबाबदारी खासदार विनायक राऊत यांच्याकडे होती. मात्र, कंपनी अचानक बंद झाल्यानंतर खासदार विनायक राऊत यांनी त्यांच्या जबाबदारीकडे दुर्लक्ष केलं. तसेच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही त्यांची आश्वासनं पाळली नाहीत. त्यामुळे आज कामगारांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. जो मराठी माणसाला न्याय देवू शकला नाही. त्याच्यामुळे मराठी माणसांचे संसार उध्वस्त झाले, तो मराठी माणसाला रोजगार काय देणार, असा सवाल खंबाटी एव्हिएशनमधील कामगारांनी उपस्थित केला. त्यामुळे रत्नागिरी सिंधुदूर्ग लोकसभा मतदार संघात खासदार विनायक राऊत यांच्याविरोधात प्रचार करण्याचा वीडा या कंपनीतील कामगारांनी उचलला आहे. ज्याने खंबाटा एव्हिएशनमधील मराठी कामगारांना उघड्यावर पाडल. तो मराठी माणसाला रोजगार काय देणार. अशा माणसाला मतं मागण्याचा अधिकार नाही, असे सांगत या कामगारांनी त्यांची खदखद व्यक्त केली.
स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातून या कंपनीतल्या कामगारांनी रत्नागिरीत पत्रकार परिषद घेत शिवसेनेची विरोध दर्शवला. रत्नागिरीत झालेल्या पत्रकार परिषदेत कामगारांनी आपली भूमिका स्पष्ट केली. या पत्रकार परिषदेला कामागारांसह माजी खासदार निलेश राणेही उपस्थित होते. आपण या कामगारांच्या पाठीशी असल्याचं राणे यांनी यावेळी स्पष्ट केलं.