सोलापूर : काँग्रेसचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील यांच्यासह 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धवलसिंह मोहिते पाटील यांनी काल सोलापूर काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी आदेश असताना गर्दी करुन नियमभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर आयुक्तालयाच्या जेल रोड पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Case filed against 12 persons including Solapur Congress district president Dhawalsinh Mohite Patil)
भांदवि 143, 188, 269, 336 सह आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 (बी) सह भारतीय साथरोग अधिनियम 1897 चे कलम 3 सह महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चे कलम 135 प्रमाणे धवलसिंह मोहिते पाटील यांच्यासह 12 जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दरम्यान, धवलसिंह मोहिते पाटील यांच्या पदग्रहण सोहळ्यावेळी माजी आमदार सिद्धराम म्हेत्रे यांनी जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे कान टोचले. व्यासपीठावर बसलेल्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांच्या पायात पाय घालणं बंद करावं. जिल्ह्यात काँग्रेस संघटना वाढवण्याची जबाबदारी एकट्या धवलसिंह मोहिते-पाटील यांची नाही तर सर्व पदाधिकाऱ्यांची आहे. मात्र, व्यासपीठावर बसलेले पदाधिकारी एकमेंकात पाय घालत बसतात. पायांना कुठेतरी बांधून ठेवा तरच काँग्रेस पक्ष पुन्हा उभा राहिल, असं सिद्धराम म्हेत्रे म्हणाले. पदाधिकाऱ्यांचं राजकारण होईल, वादामुळे थोडंफार समाधान होईल मात्र त्यामुळे पक्षाचं नुकसान होईल. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या पदग्रहण सहोळ्यावेळी सिद्धराम म्हेत्रे यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांना सुनावलं.
काँग्रेसकडून डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांची काँग्रेस पक्षाच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपती नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, शिवेसना असा प्रवास करुन पुन्हा काँग्रेसमध्ये परतलेले धवलसिंह मोहिते पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. राज्याच्या मुख्यमंत्रीपदापासून ते केंद्रीय गृहमंत्रीपदी राहिलेल्या सुशीलकुमार शिंदे यांना जिल्ह्यात पक्ष संघटन मजबूत राखण्यात यश आलं नाही, अशी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची खंत आहे. या पार्श्वभूमीवर धवलसिंह मोहिते पाटील यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची धुरा देण्यात आली आहे. त्यामुळे मोहिते-पाटील यांच्यासमोर मोठं आव्हान असणार आहे.
सध्याच्या काळात काँग्रेसची वैचारिक परंपरा लयाला जात आहे. एकेकाळी पक्षात माझ्या शब्दाला किंमत होती. पण आता ती राहिली आहे का माहिती नाही, अशी खंत माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केली होती. जूनमध्ये इंदापुरात काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रम पार पडला. त्यावेळी शिंदे यांनी ही खंत बोलून दाखवली होती. यावेळी कार्यक्रमाच्या व्यासपीठावर भाजप नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे देखील उपस्थित होते. दरम्यान सुशीलकुमार यांनी पक्षाच्या सद्यस्थितीविषयी खंत व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या होत्या.
इतर बातम्या :
Case filed against 12 persons including Solapur Congress district president Dhawalsinh Mohite Patil