मुंबई : आजचा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणाच्या (Maharashtra Political Crisis) दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आणि निर्णायक दिवस ठरण्याची शक्यता आहे. कारण शिवसेना पक्षाचं नावं आणि निवडणूक चिन्ह (Shiv Sena Political Party Name And Dhanush Baan frizzed) केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central election Commission) गोठवल्यानंतर आज महत्त्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो.
केंद्रीय निवडणूक आयोग एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटांना कोणतं नाव द्यायचं आणि कोणतं चिन्ह द्यायचं, याबाबतचा निर्णय घेण्याची दाट शक्यता आहे. या निर्णयकडे महाराष्ट्रासह संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. शिंदे आणि ठाकरे यांना आपल्या मनासारखं चिन्ह मिळतं का, हे पाहणं आज महत्त्वाचं ठरणार आहे.
अंधेरी विधानसभा पोट निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटामध्ये चढाओढ सुरु आहे. या निवडणुकीसाठी ठाकरे आणि शिंदे दोघांनाही नवं नाव आणि नवं निवडणूक चिन्ह मिळणार आहे. हे तात्पुरत्या स्वरुपाचं असेल, असंही सांगितलं जातंय.
उद्धव ठाकरे यांच्याकडून तीन चिन्हांचा पर्याय निवडणूक आयोगाला देण्यात आला आहे. त्यात उगवता सूर्य, त्रिशूल आणि मशाल अशी तीन चिन्ह देण्यात आली आहेत. तर एकनाथ शिंदे यांच्याकडून तुतारी, तलवार आणि गदा असे तीन पर्याय देण्यात आले आहेत. दोन्ही गटाकडून देण्यात आलेल्या तीन चिन्हांपैकी कोणत्या चिन्हाला केंद्रीय निवडणूक आयोग हिरवा कंदील दाखवतं, याचा आज निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदे गटाला कोणतं निवडणूक चिन्हं मिळणार, ठाकरेंना कोणतं निवडणूक चिन्ह मिळणार, या दोन्ही महत्त्वपूर्ण घडामोडींसोबत आणखी एक महत्त्वाचा निर्णय आज होण्याची शक्यता आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीच्या अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे.
संजय राऊत यांच्या कोठडीत 27 सप्टेंबर रोजी 13 दिवसांची वाढ करण्यात आली होती. ही कोठडी आज संपतेय. याप्रकरणी पीएमएलए कोर्टात सुनावणी सुरु आहे. संजय राऊत यांनी केलेल्या जामीन अर्जावर आज काय निर्णय होतो, याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलंय. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीच्या गुन्ह्यात दिलासा मिळाल्यानंतर, संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर होणाऱ्या सुनावणीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय.