नागपूर : जिल्ह्याच्या विकासासाठी येणाऱ्या निधीला कमी करण्यात येणार असल्याच्या बातम्या येत आहेत, तो निधी कमी करु नये. नाहीतर याचा नागपूरच्या विकासावर मोठा परिणाम होईल (Nagpur Funds), अशी मागणी नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी राज्य सरकारला केली (Chandrakant Bawankule).
“नागपूरच्या विकासासाठी 776 कोटी निधी दिला जातो. तो कमी करण्याच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि नागपुरातील तीनही मंत्र्यांना माझी विनंती आहे की, हा निधी 776 कोटी वरुन 850 कोटी केला पाहिजे. नागपूर ही उपराजधानी आहे, त्याचं विशेष महत्त्व आहे. नागपूरला अधिवेशन होतं, मोठ्या प्रमाणावर नागपूरवर भार असतो. नागपूरच्या सर्व विकासयोजना ज्या डीपीसीकडे चालतात, त्या निधी अभावी कमी होतील. त्यामुळे हा निधा 850 कोटी करावा”, अशी मागणी चंद्रकांत बावनकुळे यांनी केली.
“याबाबत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही निदर्शनं करणार आहोत. याप्रकरणी सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणार आहोत. मी स्वत: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटणार आहे आणि याबाबत त्यांना विनंती करणार आहे”, असंही बावनकुळे म्हणाले.
तसेच, राज्यातल्या कुठल्याही जिल्ह्यावर अन्याय करुन नागपूरला फायदा केला नाही, असं म्हणत अर्थमंत्र्यांनी केलेला आरोप चंद्रकांत बावनकुळे यांनी फेटाळून लावला.
संरपंच निवडीबाबत फडणवीस सरकारचा निर्णय योग्य होता : बावनकुळे
“सरकारने ग्रामपंचायत सरपंच निवड सदस्यातून करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा पुन्हा विचार करावा. यात ग्रामीण जनतेचा विचार घेतला पाहिजे. फडणवीस सरकारने थेट सरपंच निवडीचा निर्णय घेतला होता. म्हणून हा निर्णय घेण्यात आला असेल, तर असं करु नका. यात जनतेचं नुकसान होईल. अनेक ग्रामपंचायत जुन्या निर्णयावर आनंदी आहे. त्याचा विचार करावा. घाईघाईत निर्णय न घेता ग्रामपंचायतींचं मत मागवावं नंतर निर्णय घ्यावा”, अशीही मागणी बावनकुळे यांनी केली.