औरंगाबाद : प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आज औरंगाबाद शहरात एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं. प्रजासत्ताकदिनाच्या एका कार्यक्रमात औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि एमआयएमचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील हे एकाच मंचावर दिसले (Chandrakant Khaire and Imtiyaz Jaleel). इतकंच नाही तर खैरेंनी जलील यांचा हात हातात घेऊन तो उंचावत भारत माता की जय अशी घोषणाही दिली (Shivsena And MIM).
एमआयएम आणि शिवसेनेचं वैर संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. पण आज औरंगाबादचे शिवसेनेचे चंद्रकांत खैरे आणि एमआयएमचे इम्तियाज जलील हे एकमेकांच्या समोर आले. औरंगाबादच्या एका कार्यक्रमात खैरे आणि इम्तियाज जलील एकाच मंचावर आले. यावेळी चंद्रकांत खैरे यांनी इम्तियाज जलील यांचा हात हातात घेऊन उंचावत, ‘भारत माता की जय’ अशी घोषणा दिली. इम्तियाज जलील यांनाही घोषणा द्यायला लावली. त्यामुळे उपस्थित सर्वजण आवक झाले.
यापूर्वी खासदारांच्या खुर्चीवर बसण्यावरुन, शेजारी-शेजारी बसण्यावरुन खैरे आणि जलील यांच्यात वाद झाला होता. मात्र, आज चक्क दोघेही हातात हात घालून एकाच कार्यक्रमात दिसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
प्रजासत्ताकदिनी खैरेंचे माता-पिता पूजन
औरंगाबाद शहरात आज प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून शिवसेनेच्या वतीने माता-पिता पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चंद्रकांत खैरे यांनीही जमलेल्या अनेक माता-पिता आणि वयोवृद्ध नागरिकांचे पूजन केले. यावेळी जवळपास अकराशे माता-पित्यांचे पूजन करण्यात आले.