दत्ता कनाटे, टीव्ही ९, औरंगाबाद : शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी आपली प्रतिक्रिया टीव्ही ९ मराठीवर व्यक्त केली आहे. शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह गोठवल्यानंतर मातोश्रीने शिवसेनेतील महत्त्वाच्या नेत्यांची मातोश्रीवर तातडीची बैठक बोलवली आहे. यावेळी मुंबईकडे जाताना चंद्रकांत खैरे यांनी टीव्ही ९ मराठीला आपली पहिली प्रतिक्रिया दिली. यावेळी चंद्रकांत खैरे हे अतिशय रागवलेले होते, आणि धनुष्यबाण गोठवल्यानंतर त्यांचं दुखावलेलं मन हे त्यांच्या वाक्यावाक्यात दिसत होतं.
चंद्रकांत खैरे यांच्या बोलण्यातील महत्त्वाचं मुद्दे खाली देत आहोत, खरं तर त्यांचा तो राग असल्याचं दिसून आलं, त्यांच्या बोलण्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे पुन्हा पुन्हा अधोरेखित होत होते. चंद्रकांत खैरे यांनी हे देखील सांगितलं आहे की, “शिवसेना संपणार नाही, पुन्हा उभारी घेईल, पण भाजपाला हे भोगावं लागणार आहे”.
“या गद्दांरांनी खूप मोठं पाप केलं आहे, जे धनुष्यबाणावर निवडून आले, आमदार खासदार झाले, महापौर झाले, नगरसेवक झाले, त्यांचं हृदय शिवसेना फोडून एकनाथ शिंदे यांनी डॅमेज केलं आहे. म्हणून आम्ही सर्वांनी ठरवलं आहे की, पुन्हा शिवसेना उभारु, उद्धवसाहेबांच्या नेतृ्त्वात आम्ही जिंकू”, असं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे.
“गद्दारांचा विजय होणार नाही, शिवसेनेचा आतापर्यंत रेकॉर्ड आहे, ज्यांनी शिवसेना संपवली ते संपले.माझ्या शिवसेनेचं चिन्हं आहे, तरी माझ्या छातीवर माझं चिन्ह धनुष्यबाण कायम राहणार आहे”, असं यावेळी चंद्रकांत खैरे यांनी सांगितलं.
“भयंकर राग आलाय त्या एकनाथ शिंदे यांचा, कुणाच्या नादी लागून फोडली रे बाबा शिवसेना, साधा रिक्षावाला, करोडो रुपये छापणारा, का फोडली ही संघटना” अशा तीव्र आणि संतापाच्या स्वरुपात शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी आपलं मत मांडलं आहे.
“देवेंद्रजी, या महाराष्ट्राचं वाटोळं कशासाठी केलं तुम्ही, ५ वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले,तुम्ही असं करायला नको होतं”
शिवसेनेवर भयंकर संकटं आली आणि त्यातून शिवसेना उभी राहिली.” चंद्रकांत खैरे यांनी देवेंद्रजी यांच्यावरही राग व्यक्त करत महाराष्ट्राचं वाटोळं केल्याचं म्हटलं आहे.
“आमच्या डोळ्यात अश्रू आहेत की हे असं व्हायला नको होतं.मी रात्रभर झोपलो नाही, मला झोप आली नाही, देवा हे काय केले तू, ज्यांनी गद्दारी केली बाळासाहेबांशी, शिवसेनेशी ते संपले आहेत.” चंद्रकांत खैरे यांनी अतिशय तीव्रतेने आपण दुखावलो गेलो आहोत, अशा स्वरात आपली प्रतिक्रिया दिली आहे.