दत्ता कनवटे, औरंगाबादः भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी शिवसेनेची सुपारी घेतली आहे का? उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबद्दल तो काहीही बडबड करत असतो, असा पलटवार शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी केला आहे. कोरोना काळात सगळा पैसा उद्धव ठाकरे यांच्या घरात गेल्याचा गंभीर आरोप आज किरीट सोमय्या यांनी केला. त्यावरून चंद्रकांत खैरे आक्रमक झाले. औरंगाबादेत टीव्ही9 शी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
उद्धव ठाकरेंनी पैसे घेतले म्हणणारा किरीट सोमय्या मूर्ख आहे… मग हे एवढे खोके कुणी दिले, हे त्याला महितीय का? नागपूर आले का दिल्लीहून आले? त्याची माहिती काढावी, असा सल्ला खैरे यांनी दिला.
किरीट सोमय्या उठसूठ शिवसैनिकांवर बोलतात. शिवसैनिक आता भडकले आहेत. विकासावर बोलावं. एमपीएससीचे मुलं आज रस्त्यावर उतरलेत, त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावं, असा सल्ला चंद्रकांत खैरे म्हणाले.
किरीट सोमय्या यांना वेळ आल्यावर आम्ही शिवसैनिक काय आहेत हे दाखवू, असा इशारा चंद्रकांत खैरे यांनी दिला. किरीट सोमय्यांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाऊ, त्याची जीभ पकडू आणि तोतऱ्या… तुझी बडबड सिद्ध करायला सांगू, असा इशाराही खैरेंनी दिला.
पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत यावं, आम्ही त्यांचा योग्य सन्मान राखू, असं वक्तव्य ठाकरे गटाचे आमदार सुनिल शिंदे यांनी केलंय. यावर चंद्रकांत खैरेंनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे.
पंकजा मुंडे यांच्यावर भाजपमध्ये अन्याय होतोय. मुंडे साहेबांमुळे महाराष्ट्रात भाजप मोठा झालाय. पण पक्षात राजकारण खूप आहे. सुनिल शिंदे यांचं नक्कीच उद्धव साहेबांशी बोलणं झालंय. त्यामुळेच त्यांनी हे वक्तव्य केलं असेल. पंकजाताईंनी शिवसेनेत आलं पाहिजे, असं वक्तव्यही चंद्रकांत खैरेंनी केलं.
विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघात नाशिकमधून उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत काल प्रचंड राजकीय कुरघोडी पहायला मिळाली. यावरून चंद्रकांत खैरेंनी नाराजी व्यक्त केली. देवेंद्र फडणवीस यांनी अशा फोडा-फोडीचं राजकारण करू नये. यातून कोणताही पक्ष मोठा होत नाही. जनाधारानेच खऱ्या अर्थाने पक्ष वाढतो, असं वक्तव्य खैरे यांनी केलंय.