औरंगाबाद: खासदार गजानन कीर्तिकर यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करून शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाकरे गटामध्ये एकच खळबळ उडाली असून ठाकरे गटाकडून कीर्तिकर यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे. ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनीही कीर्तिकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. गजाभाऊंना म्हातारपणात म्हातारचळ लागल्याची खोचक टीका चंद्रकांत खैरे यांनी केली आहे. चंद्रकांत खैरे टीव्ही9 मराठीशी बोलत होते. यावेळी त्यांनी कीर्तिकर यांचा खरपूस समाचार घेतला.
गजाभाऊंनी पक्ष सोडला याचं मला दु:ख असं झालं. गजाभाऊ कीर्तिकर हे आमचे मार्गदर्शक होते. त्यांनी सुरुवातीच्या काळात औरंगाबाद आणि जालन्यात खूप मोठं काम केलं होतं. आम्हाला त्यांनी घडवलं.
त्यांनी बाळासाहेबांसोबत काम केलं. दोनदा खासदार झाले. पक्षाने त्यांना पाचवेळा आमदार केलं. मंत्रीपदही दिलं. इतकं पक्षांनी दिल्यानंतरही या वयात ते गद्दारांच्या बरोबर गेले. हे मला पटलं नाही. त्यांच्या निर्णयाचं दु:ख झालं, असं चंद्रकांत खैरे म्हणाले.
राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबतची आघाडी अमान्य असल्यानेच आम्ही शिंदे गटासोबत जात आहोत, असं कीर्तिकर म्हणाले. त्यावरही त्यांनी टीका केली. आता हे सगळे असं बोलत आहेत. मग या गद्दारांसोबत जायचं का? ज्यांनी शिवसेना फोडली त्या गद्दारांसोबत जाणं हा पर्याय होऊ शकतो का? असा सवाल त्यांनी केला.
पक्षात राहून मतं मांडायची असतात. पश्र नेतृत्वाला फोर्स करायचा असतो. पण ते कधीच बोलले नाही. आताच त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबतची आघाडी कशी आठवली? अडिच वर्ष राज्यात आघाडीचं सरकार होतंच ना? त्यावेळी का बोलले नाही? आघाडीचं सरकार आलं तेव्हा पहिल्याच दिवशी बोलायला हवं होतं? उगाच गजाभाऊंना म्हातारपणात म्हातारचळ लागलं आहे, अशी खोचक टीका त्यांनी केली.
गजानन कीर्तिकर यांचा मी निषेध करतो आणि कीर्तिकर यांना कुणीही माफ करणार नाही. त्यांना आता कुणी साधा नमस्कारही करणार नाही, असं सांगतानाच गजाभाऊ तुम्ही असं का केलं? असा सवालही त्यांनी केला.