औरंगाबाद : शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी दुसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. खैरे यांनी दुसऱ्यांदा उमेदवारी अर्ज भरण्यामागील कारण अत्यंत धक्कादायक आहे. खैरेंनी ज्योतिष शास्त्रानुसार शुभ मुहूर्त म्हणून आज उमेदवारी अर्ज पुन्हा भरला. यापेक्षा संतापजनक म्हणजे राशीतून चंद्रमा विजय क्षेत्रातून फिरत आहे, म्हणून आज पुन्हा चंद्रकांत खैरे यांनी उमेदवारी अर्ज भरल्याचं सांगण्यात येत आहे. अंधश्रद्धेत बुडालेले खासदार चंद्रकांत खैरेंनी मुहूर्तासाठी दुसऱ्यांदा अर्ज भरला.
समाजातील अंधश्रद्धा दूर करण्याचं काम लोकप्रतिनिधींचं आहे. मात्र खासदार चंद्रकांत खैरेंसारखे लोकप्रतिनिधीच अंधश्रद्धेत इतके बुडाल्याने, ते समाजातील अंधश्रद्धा कशी दूर करणार हा प्रश्न आहे.
भद्रा मारोतीच्या दर्शनाने पहिला फॉर्म
दरम्यान, चंद्रकांत खैरे यांनी आपला पहिला उमेदवारी अर्ज 30 मार्च रोजी दाखल केला. यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेही उपस्थित होते. औरंगाबादेतील भद्रा मारोतीच्या दर्शनाने खैरेंनी आपला पहिला फॉर्म भरला होता. त्यानंतर आज खैरेंना राशीतून चंद्रमा विजय क्षेत्रातून फिरत असल्याची प्रचिती झाल्याने दुसरा अर्ज भरला. त्यामुळे अंधश्रद्धाळू खैरेंना भद्रा मारोतीवर विश्वास नव्हता का असा प्रश्न आहे.
औरंगाबादेतील लढत
दरम्यान, औरंगाबादेत शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांच्याविरुद्ध काँग्रेसने सुभाष झांबड यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे इथे खैरे विरुद्ध झांबड असा सामना रंगणार आहे. मात्र झांबड यांच्या उमेदवारीमुळे काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिला. इतकंच नाही तर त्यांनी काँग्रेस पक्ष कार्यालयातील स्वत:च्या खुर्च्याही नेल्या.
कोण आहेत अब्दुल सत्तार?
अब्दुल सत्तार हे औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार आहेत. गेल्या जवळपास 30 वर्षांपासून राजकारणात सक्रीय असून, 1984 साली ग्रामपचंयत निवडणुकीपासून त्यांनी राजकीय जीवनाची सुरुवात केली. सिल्लोड आणि परिसरात अब्दुल सत्तार यांची राजकीय ताकद मोठी आहे.
संबंधित बातम्या
आदित्यसोबत भद्रा मारोतीचं दर्शन, चंद्रकांत खैरेंचा अर्ज दाखल
काँग्रेस सोडल्यानंतर अब्दुल सत्तारांनी पक्ष कार्यलायातील खुर्च्याही घरी नेल्या!