औरंगाबादः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या पैठणमधील सभेत किती खुर्च्या, किती गर्दी यावरून शिंदेसेना आणि शिवसेना यांच्यात वाद रंगलाय. चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) आणि अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्यासाठी या सभेत कोपऱ्यात दोन खुर्च्या टाकायला पाहिजे होत्या, म्हणजे त्यांना ही गर्दी कळली असती. असं वक्तव्य शहाजी बापू पाटील यांनी काल केलं.. चंद्रकांत खैरे यांनी या टोमण्याला खुर्चीद्वारेच उत्तर दिलंय. शहाजी बापू पाटील यांनी मातोश्री आणि उद्धव ठाकरेंबद्दल कधीही अवाक्षर काढलं नाही. त्यामुळे तुम्ही मातोश्रीवर या, मी तुम्हाला मोठी खुर्ची देतो, असं आवाहन खैरे यांनी केलंय.
खैरे म्हणाले, ‘ आम्ही टीव्हीत पहात होतो. ती गर्दी पैठणबाहेरचीच जास्त होती. शहाजी बापू पाटील म्हणजे.. ही झाडी, हे फलानं… असं.. हे फक्त काही दिवस चालणार? कामं तर करावी लागतील की नाही? मी शहाजी बापू पाटलांना सांगतो, तुम्ही काही मतांनीच निवडून आले होते. उद्धवजींनी तुम्हाला मोठं स्थान दिलं होतं. उद्धवजींच्या बाबतीत तुमचं मत चांगलं आहे. मग चला मातोश्रीवर जाऊया.. असं मी म्हणतो..
खैरे पुढे म्हणाले, मी शहाजी बापू पाटलांना सांगतो, तुम्ही आमच्यासाठी दोन खुर्च्या ठेवल्या होत्या. त्यापेक्षा मी तुम्हाला चांगली खुर्ची देतो. उद्धवजी, मातोश्रीकडे जाऊन देतो. तुम्ही या तिकडे…
रावसाहेब दानवे यांनी संदिपान भुमरे यांना पैठणचा बोक्या खोक्यांना विकला जाणार नाही, असं वक्तव्य केलं. यावर चंद्रकांत खैरे यांनीही टोला मारला. दानवेंच्या भाषणानंतर मला बरेच फोन आले.. हा पैठणचा बोका कोण… असे विचारले जात होते, असं खैरे म्हणाले..
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे औरंगाबादेत ज्या रस्त्यावरून गेले, तेथे शिवसैनिकांनी गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केलं. हे योग्य केल्याचं खैरे म्हणाले. मुख्यमंत्री शिंदेंनी हे गलिच्छ राजकारण असल्याची टीका केली. पण गलिच्छ राजकारण तेच करतात. त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या नावाखाली धोका केल्याची टीक चंद्रकांत खैरे यांनी केली.