पंढरपुरात चंद्रकांत पाटील यांचे शिवसेनेला दोन प्रश्न

| Updated on: Nov 08, 2019 | 8:08 AM

सत्तास्थापनेची काळजी विठ्ठलाला आहे, पण भाग्य से पहले और भाग्य से जादा कुछ नहीं मिलता, असं चंद्रकांत पाटील पंढरपुरात म्हणाले.

पंढरपुरात चंद्रकांत पाटील यांचे शिवसेनेला दोन प्रश्न
Follow us on

पंढरपूर : काँग्रेससोबत जाऊन रामजन्मभूमीचा आग्रह सोडणार आहे का? 370 कलम रद्द केलं त्याचा आनंद मानाल की दुःख वाटून घ्याल? असे प्रश्न महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला विचारले. कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने पाटील दाम्पत्याच्या हस्ते पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणी यांची शासकीय महापूजा करण्यात आली. यावेळी राज्यातील शेतकरी आणि सामान्य जनता सुखी होऊ दे, असं साकडं चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil at Pandharpur) यांनी विठ्ठलाच्या चरणी घातलं.

सत्तास्थापनेची काळजी विठ्ठलाला आहे, पण भाग्य से पहले और भाग्य से जादा कुछ नहीं मिलता. आपण प्रयत्न तर खूप केलेत, यश देणं देवाच्या हातात आहे. प्रयत्न आणखी काय करावेत? महायुतीचं सरकार लवकरात लवकर यावं. बारा वाजेपर्यंत वेळ आहे, विठ्ठल काहीतरी चमत्कार करेल आणि सत्तास्थापन होईल, असा विश्वासही चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

भाजपकडून सत्तास्थापनेसाठी मुदतवाढीची चाचपणी, सत्तानाट्य लांबणार?

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होईल असं वाटत नाही, असंही पाटील यावेळी म्हणाले. शिवसेना कधीही काँग्रेसबरोबर जाणार नाही. हिंदुत्वाचा धागा सेना सोडणार नाही. माझा शिवसेनेला प्रश्न आहे, त्यांच्यासोबत जाऊन रामजन्मभूमीचा आग्रह सोडणार आहे का? 370 कलम रद्द केलं त्याचा आनंद मानाल की दुःख वाटून घ्याल? त्यामुळे सेना काँग्रेस बरोबर जाणार नाही. प्रत्येकाला देव सद्बुद्धी देत असतो, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

सध्या बदललेलं ऋतुचक्र सुरळीत होऊ दे अशी मी विठ्ठलचरणी विनंती केली. यावर्षी राज्यासमोर अनेक आव्हाने आली. सुरुवातीला दुष्काळस्थिती होती. त्यानंतर महापुराला सामोरे जावे लागले आणि आता अवकाळी पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी राज्य शासनाने उपाययोजना केल्या आहेत. केंद्र सरकारकडेही मदत मागितली आहे, अशी माहिती चंद्रकांत पाटलांनी दिली.

गेली तीन चार वर्ष निर्मल वारी करण्यासाठी प्रयत्न केला गेला. वारीच्या मुक्कामाच्या ठिकाणी स्वच्छता ठेवण्यासाठी प्रयत्न केले गेले. त्याला अतिशय चांगले यश आले. पुढील वर्षी धूरमुक्त वारी करण्यासाठी शासन प्रयत्नशील असणार आहे, अशी माहितीही त्यांनी (Chandrakant Patil at Pandharpur) दिली.

संत तुकाराम भवन येथे झालेल्या कार्यक्रमात चंद्रकांत पाटलांच्या हस्ते मानाचे वारकरी सुनील महादेव ओमासे आणि नंदा ओमासे यांचा सत्कार करण्यात आला. मिरज तालुक्यातील बेडगच्या शेतकरी कुटुंबातील ओमासे 2003 पासून वारी करतात. यावेळी त्यांना मोफत एसटी पासही देण्यात आला.