रत्नागिरी : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर स्तुतीसुमने उधळली आहेत (Chandrakant Patil on Shivsena). तसेच शिवसेनेच्या भुमिकेचे स्वागत करताना सरकारचं अभिनंदनही केलं. त्यामुळे नवी राजकीय चर्चा होत आहे. शिवसेनेने वारकरी विद्यापीठ करण्याची घेतलेली भूमिका योग्य आहे. त्यांच्या या भूमिकेचं स्वागत चंद्रकांत पाटील यांनी केलं (Chandrakant Patil on Shivsena).
चंद्रकांत पाटील म्हणाले, “शिवसेनेने वारकरी विद्यापीठ करण्याची घेतलेली भूमिका योग्य आहे. त्यांच्या या भूमिकेचं स्वागत आहे. त्यांच्या या निर्णयासाठी सरकारचं अभिनंदन. वारकरी विद्यापीठ व्हायलाच हवं.”
“गृहखातं राष्ट्रवादीकडे असलं तरी मुख्यमंत्र्यांनी लक्ष ठेवावं”
मुंबईत ‘फ्री काश्मीर’चे फलक झळकले. त्याबद्दल चंद्रकांत पाटील यांनी चिंता व्यक्त केली. या प्रकरणात मी मुख्यमंत्र्यांना गृह खातं राष्ट्रवादीकडं असलं तरी त्यावर लक्ष ठेवण्याची विनंती करणार आहे. नेमकं काय सुरु आहे याकडे मुख्यमंत्र्यांनी गांभीर्यानं लक्ष द्यावं, असं मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं.
“सामंतांच्या बोगस डिग्रीचा वाद निर्रथक”
उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री उदय सामंत यांच्या बोगस डिग्रीचा वाद निर्रथक असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले. माजी शिक्षण मंत्री आणि विद्यमान शिक्षण मंत्र्यांच्या एकाच विद्यापीठाच्या बोगस डिग्रीबाबत झालेला योगायोग बघून मला गंमत वाटते, अशी मिश्लिक प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी नोंदवली.
“राष्ट्रपती निवडणुकीसाठी शिवसेनेकडून शरद पवारांचं प्रमोशन”
राष्ट्रपती निवडणुकीसाठी शिवसेना शरद पवारांचं प्रमोशन करत आहे. यावर कोणी काय बोलावं, काय होण्याची इच्छा व्यक्त करावी आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी काय करावं हा ज्याचा त्याचा विषय आहे. पण 2022 खूप दूर आहे. त्यावेळी भाजपचा स्वत:चा उमेदवार असेल. भाजपचे नेते या संदर्भातील निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली.
चंद्रकांत पाटील यांनी यावेळी कोल्हापूरमधील मटणदरावरुन सुरु असलेल्या वादावरही भाष्य केलं. ते म्हणाले, “कोल्हापूरातील मटण व्यावसायिकांसदर्भात सरकारने अनुदान द्यावं, असं मी सुचवणार नाही. यावर प्रशासनानं पुन्हा बैठक घ्यावी.”
“भाजप महाविकास आघाडीला पुरुन उरेल”
राज्यातील 6 जिल्हा परिषद निवडणुकांसाठी आज (7 जानेवारी) मतदान होतंय. या मतदानाच्या निकालात भाजप महाविकास आघाडीला पुरुन उरेल, असं मत चंद्रकात पाटील यांनी व्यक्त केलं.