अमरावती : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केलाय. अनिल देशमुख यांनी दरोडा घालयचा आणि मग पोलिसांनी त्यांना अटक करायची नाही, तर काय हार घालयचा का? असा सवाल चंद्रकांत पाटलांनी केलाय. तसेच विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी ऐनवेळी मार्ग खुले असल्याचं सांगत आमच्या पाठीत खंजीरच खुपसला होता, असाही पुनरुच्चार त्यांनी केला. चंद्रकांत पाटील आजपासून (2 सप्टेंबर) दोन दिवस अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, “अनिल देशमुख यांना क्लिन चिट मिळाली की नाही याची चौकशी आहे. तुम्ही दरोडा घालायचा आणि मग पोलिसांनी अटक करायची नाही, तर काय हार घेऊन स्वागत करायचं का? या या उत्तम दरोडा घातला असं म्हणायचं का? त्यामुळे सीबीआयने काय करावं, न करावं हा माझा विषय नाही. हे काय चाललं आहे. अनिल देशमुख यांची संपत्ती धडधड जप्त होते आहे. मग उगाच जप्त होत आहे का?”
“आमच्या पाठीत खंजीर खुपसलाच आहे. विधानसभा निवडणुकी आधी युती करायची, मोदींच्या नावानं मतं मागायची आणि जागा जिंकून आल्या की काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जायचं. विधानसभा निकाल लागत होते त्या दिवशी 4 वाजता देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद होती. त्यावेळी मी पुण्यातून येत होतो. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी 4 वाजताची पत्रकार परिषद तुमची तुम्ही करा आणि माझी मी करतो असं म्हटले. तिथेच गडबड झाल्याचं लक्षात आलं. त्यावेळी त्यांनी सर्व मार्ग मोकळे आहेत असं म्हटलं, मग आधी युती का केली? हा विश्वासघात आहे की नाही? विश्वासघाताचंच नाव पाठित खंजीर खुपसणं आहे. त्यात मी चुकीचं काय म्हटलं?” असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी विचारला.
चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेशी युतीचा मुद्दाच नसल्याचं सांगत स्वबळावर 180 जागा लढवणार असल्याचं स्पष्ट केलं. ते म्हणाले, “सध्या भाजपचा प्रवास स्वबळाचा आहे. भाजप शिवसेनेच्या युतीचा कोणताही विषय सध्या नाही. आम्ही 87 हजार बुधवर 180 जणांना उभं करण्यासाठी काम करत आहोत. याची टोटल 1 कोटी 80 लाख होते. आम्हाला आता कुणाकडूनही फसवलं जायचं नाहीये. आम्ही एकट्याच्या जीवावर लढणार आहोत. शेवटी शिवसेना कुठं होती? मुंबईत होती. शिवसेनेला प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी बोट धरुन मराठवाडा विदर्भात आणलं आणि आता 56 वर तुम्ही मुख्यमंत्री होऊन बसलात आणि 105 वाल्याला टाटा, बाय-बाय केलं. त्यामुळे आम्हाला कुणाबरोबरही लढायचं नाही.”
महाविकासआघाडीचे नेते आमचं डोकं ठिकाणावर नाही, आमचं पोट दुखतं असं वारंवार म्हणत आहेत, अरविंद सावंतही तसंच म्हणत आहेत. अरविंद सावंत डॉक्टर आहेत का आमचं पोटात दुखतं की नाही हे सांगायला, असं मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं. तसेच अरविंद सावंत यांनी भाजपशिवाय मुंबईत लोकसभा निवडणूक जिंकून दाखवावं असं आव्हानही दिलंय.
Chandrakant Patil criticize Anil Deshmukh Uddhav Thackeray while on Amravati tour