Chandrakant Patil : ‘थापा मारून दिवस ढकलणे बंद करा’, चंद्रकांत पाटलांचा जयंत पाटलांना टोला

| Updated on: Apr 22, 2022 | 7:25 PM

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटलांवर निशाणा साधलाय. 'पक्षाच्या संवाद यात्रेत सरकारच्या चांगल्या कामांबद्दल किंवा पक्षाच्या विचारसरणीबद्दल बोलण्यासारखे काहीच नाही म्हणून थापा मारून आणि टिंगल टवाळी करून दिवस ढकलणे जयंत पाटील यांनी बंद करावे, असं चंद्रकांत पाटील म्हणालेत.

Chandrakant Patil : थापा मारून दिवस ढकलणे बंद करा, चंद्रकांत पाटलांचा जयंत पाटलांना टोला
जयंत पाटील, चंद्रकांत पाटील
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची परिसंवाद यात्रा सध्या सुरु आहे. इस्मालपूरमध्ये झालेल्या सभेत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केलेल्या वक्तव्याचा ब्राम्हण समाजाकडून निषेध व्यक्त केला जातोय. राज्यात विविध ठिकाणी ब्राम्हण समाजाकडून आंदोलन करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दिलगिरी व्यक्त केलीय. तर या मुद्द्यावरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी जयंत पाटलांवर निशाणा साधलाय. ‘पक्षाच्या संवाद यात्रेत सरकारच्या चांगल्या कामांबद्दल किंवा पक्षाच्या विचारसरणीबद्दल बोलण्यासारखे काहीच नाही म्हणून थापा मारून आणि टिंगल टवाळी करून दिवस ढकलणे जयंत पाटील यांनी बंद करावे, असं चंद्रकांत पाटील म्हणालेत.

चंद्रकांत पाटलांकडून प्रश्नांची सरबत्ती

जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवार संवाद यात्रेत कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलताना थापा मारण्याचा उच्चांक केला. काँग्रेस पक्षाने कधीच नाव बदलले नाही म्हणून जयंत पाटील अभिमानाने सांगतात. त्यांनी हे सांगावे की, शरद पवार यांनी 1978 मध्ये काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर निवडून येऊन जनता पार्टीच्या मदतीने मुख्यमंत्रिपद मिळवले तो काँग्रेस पक्ष खरा होता की, इंदिरा गांधी यांचा काँग्रेस पक्ष खरा होता? शरद पवार यांचा काँग्रेस एस हा मूळ काँग्रेस पक्ष होता की, काँग्रेस आय हा मूळ पक्ष होता? शरद पवारांनी नंतर काँग्रेसमध्ये त्यांचा पक्ष विलीन केला त्यावेळी कधीही नाव न बदलणारा मूळ काँग्रेस पक्ष कोणता होता? 1999 साली काँग्रेस पक्षाने शरद पवारांची हकालपट्टी केल्यानंतर त्यांनी जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला त्याला अधिकृत काँग्रेस म्हणायचे का? शरद पवारांनी ज्या सोनिया गांधींना विदेशी म्हणून विरोध केला आणि नंतर त्यांच्याच नेतृत्वाखालील आघाडीत मंत्री झाले त्यांचा काँग्रेस पक्ष खरा का? अशी प्रश्नांची सरबत्तीच चंद्रकांत पाटील यांनी केलीय. काँग्रेसमधून हकालपट्टी झालेल्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपण नेतृत्व करता आणि इंडियन नॅशनल काँग्रेस नावाचा आणखी एक काँग्रेस पक्ष आहे. नक्की कोणत्या काँग्रेसने नाव बदलले नाही म्हणून सांगता, हे सुद्धा जयंतरावांनी स्पष्ट करावे, असा टोलाही त्यांनी लगावलाय.

‘आम्ही निष्ठा बदलल्या नाहीत आणि हिंदुत्वाचा विचारही सोडला नाही’

पाटील म्हणाले की, थापा मारण्याचा उच्चांक करताना जयंतराव म्हणाले की, भाजपाचा जन्म होऊन 50 वर्षेही झाली नाहीत. त्याचवेळी त्यांनी सांगितले की, भाजपाने पन्नास वर्षात तीन वेळा नाव बदलले. काय बोलतो हे त्यांनाच समजत नाही. जनसंघाची स्थापना 1951 साली म्हणजे सत्तर वर्षांपूर्वी झाली. 1975 साली देशात आणीबाणी लागू करून पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लोकशाहीची हत्या केली त्यावेळी जनसंघाने लोकशाहीच्या रक्षणासाठी लढा दिला व त्याचाच एक भाग म्हणून आपला पक्ष जनता पक्षात विलीन केला. नंतर जनसंघाचे नेते बाहेर पडल्यामुळे 1980 साली भाजपाची स्थापना झाली. आणीबाणीच्या विरोधात लढा देताना भाजपाने त्यावेळची परिस्थिती म्हणून जे निर्णय घेतले त्यामुळे पक्षाच्या नावात बदल झाला. पण आम्ही आमच्या निष्ठा बदलल्या नाहीत आणि हिंदुत्वाचा विचारही सोडला नाही.

‘देशातील हिंदुत्वाला पाच हजार वर्षांची परंपरा’

देशातील हिंदुत्वाला पाच हजार वर्षांची परंपरा आहे आणि त्या परंपरेचा पाईक होण्याचा भाजपाला अभिमान आहे. पुण्याच्या कार्यक्रमात मी हेच सांगितले. पण विषय समजून न घेता हिंदुत्वाची कुचेष्टा करणाऱ्यांनी काहीही टिंगल केली तरी आम्ही ही पाच हजार वर्षांची परंपरा सोडणार नाही, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.

इतर बातम्या :

Boris Johnson India Tour: एकदम सचिन तेंडूलकर, अमिताभ बच्चन झाल्यासारखं वाटलं, इंग्लंडचे पंतप्रधान मोदींच्या स्वागताने भारावले

Uddhav Thackeray : राणा दाम्पत्यांच्या विरोधात मुख्यमंत्र्यांचं शिवसैनिकांना पाठबळ, हात जोडून अभिवादन आणि हातही उंचावला