मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे (Chandrakant Patil on Sharad Pawar). एकाच वेळी राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी पवारांचं कसं ऐकतात? असा प्रश्न उपस्थित करत चंद्रकांत पाटलांनी यासाठी हवा तेवढा वेळ देण्याची तयारी दर्शवली. शरद पवार यांनी चंद्रकांत पाटलांना माझ्यावर पीएचडी करण्यासाठी 10 ते 12 वर्ष लागेल, असं वक्तव्य केलं. यावर चंद्रकांत पाटीलांनी यांनी मी विद्यार्थी म्हणून 10-12 वर्षे अभ्यास करण्यास तयार असल्याचं म्हणत प्रत्युत्तर दिलं आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले, “एखादा विषय जेव्हा आपण मिशन म्हणून करतो, त्याला अभ्यास आणि संशोधनासाठी निवडतो, तेव्हा त्यासाठी जो वेळ लागेल तो लागेल. त्यांना 12-13 वर्षे वाटत असेल, कदाचित जास्तही लागेल. माझी त्याची तयारी आहे. त्यांच्या 50 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीचा मला अभ्यास करायचा आहे. त्यासाठी वेळ देण्याची विद्यार्थी म्हणून माझी तयारी आहे.”
शरद पवार यांना मागील 50 वर्षात महाराष्ट्रात कधीही 5 ते 7 हून अधिक खासदारही निवडून न आणता देशाच्या राजकारणाच्या मध्यवर्ती कसं राहता आलं? ते एकाच वेळी राज ठाकरेंनाही हाताळतात. राज ठाकरेंना हवं ते करायला लावतात. दुसरीकडे उद्धव ठाकरेंना देखील हवं ते करायला लावतात. देशाच्या नेत्या सोनिया गांधी यांना देखील हवं ते करायला लावतात. हे त्यांना कसं जमतं हा माझा पीएचडीचा आणि अभ्यासाचा विषय असेल. त्याला वेळ लागेल. मला त्यांच्या 50 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीचा अभ्यास करायचा आहे. त्यासाठी वेळ देण्याची विद्यार्थी म्हणून माझी तयारी आहे, असंही त्यांनी नमूद केलं.
“शब्दकोट्या उद्धव ठाकरेंना चांगल्या येतात”
बारामतीचा आधार घेत 12 वर्षे म्हटले का असा प्रश्न विचारला असता चंद्रकांत पाटील म्हणाले, अशा शब्दकोट्या शरद पवार करत नाहीत. उद्धव ठाकरेंना शब्दकोट्या चांगल्या करता येतात, असं उत्तर दिलं. तसेच त्यांनी 50 वर्षात जे केलं ते इतकं गहन आहे की ते समजून घ्यायला 12 वर्षे लागतील असं त्यांना वाटलं असेल, असं पाटील म्हणाले.
Chandrakant Patil on Sharad Pawar