पुणे : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत काम करायला नक्कीच आवडेल, पण ते नेहमीच आमच्यापासून दूर राहिले आहेत, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं. त्यामुळे भाजपचे सूर वंचितशी जुळणार का, असा प्रश्न (Chandrakant Patil on Prakash Ambedkar) आता विचारला जात आहे.
अकोला जिल्हा परिषदेत वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये अध्यक्षपदासाठी रस्सीखेच सुरु आहे. मात्र आम्हाला कोणाकडूनही प्रस्ताव आलेला नसून सध्या आम्ही तटस्थ आहोत. प्रस्तावानंतर आम्ही नक्की विचार करु. प्रस्ताव काय येतो त्यावरुन निर्णय घेऊ, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.
स्थानिक कार्यकर्त्यांबरोबर यासंदर्भात चर्चा सुरु आहे. ते कोणाबरोबर कम्फर्टेबल आहेत, यावरुन निर्णय घेऊ, असंही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.
‘वंचित बहुजन आघाडी’ ही भाजपची ‘बी टीम’ कधीच असू शकत नाही. कारण प्रकाश आंबेडकरांनी नेहमीच भाजपवर टीका केलेली आहे, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला.
प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर काम करायला आम्हाला नक्कीच आवडेल. मात्र ते नेहमीच आमच्यापासून दूर राहिलेले आहेत. सामाजिकदृष्ट्या आम्ही एकत्र काम केलं पाहिजे, असं माझं मत असल्याचं चंद्रकांत पाटलांनी पुण्यात ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना व्यक्त केलं.
एकीकडे, प्रकाश आंबेडकर यांचे सख्खे भाऊ आणि रिपब्लिकन सेना या राजकीय संघटनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी आपण वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडण्याची घोषणा केली. त्याचबरोबर राज्यात एक नवीन पर्याय देण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे राज्यात नवीन समीकरणे उदयाला येण्याची शक्यता आहे.
सध्या प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग राज्यात अजूनही पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांचे खंदे शिलेदार या प्रयोगातून बाहेर पडत आहेत. आणि आता त्यांचे सख्खे बंधू वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडल्यामुळे वंचित बहुजन आघाडीचं नव्याने मूल्यमापन सुरु झालं आहे. Chandrakant Patil on Prakash Ambedkar