पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत अमराठी कार्यकर्ते आणि नेते सहभागी होणं, ही चांगली गोष्ट आहे. मनसेसोबत युती होऊ शकते, पण त्यांनी अन्य प्रांतियांबद्दलची भूमिका बदलली पाहिजे, अशी भूमिका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. (Chandrakant Patil reacts on BJP alliance with MNS)
“मनसेसोबत युती होऊ शकते, पण…”
कोणी आपला पक्ष कसा वाढवायचा, याचं स्वातंत्र्य आपल्या लोकशाहीत आहे. मनसेमध्ये अमराठी सहभागी होत असतील, तर ही चांगली गोष्ट आहे. मनसेच्या देशभक्ती आणि हिंदुत्वाबद्दल शंका नाही. त्यामुळे मनसेसोबतच्या युतीबाबत तुम्ही विचारत असाल, तर मनसेसोबत युती होऊ शकते, पण त्यांनी अन्य प्रांतियांबद्दलची भूमिका बदलली पाहिजे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
“गिमिकने सत्ता स्थापन”
महाविकास आघाडीला लोकांनी निवडून दिलेले नाही. गिमिकने त्यांनी सत्ता स्थापन केली. त्यामुळे लोकांना ते उत्तरदायी नाहीत, असं त्यांना वाटतंय. म्हणून हम करेसो कायदा, अशी प्रवृत्ती असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले.
“‘भारतरत्नां’ना अभिव्यक्ती स्वातंत्र्य काही आहे की नाही?”
भारतरत्नने सन्मानित विक्रमादित्य सचिन तेंडुलकर, गानकोकीळा लता मंगेशकर यांनी देशहिताचे ट्वीट केले आहेत त्याची तुम्ही चौकशी करता? त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य काही आहे की नाही? असे सगळे विषय एका बाजूला चाललेत, अशी टीकाही चंद्रकांतदादांनी केली.
“पूजा चव्हाण प्रकरणी कारवाई का नाही?”
पुण्यातील तरुणी पूजा चव्हाणच्या आत्महत्येला 48 तास झाले, काही कारवाई नाही. पोलीस म्हणतात की तरुणीच्या नातेवाईकांनी तक्रार द्यायला हवी, पण सुमोटो कंप्लेन्ट लॉन्च नाही का करता येत? कायदा विषय संपला का, तुम करे सो कायदा आहे का? असे प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केले.
“राज्यपालांना विमान नाकारणे कदृपणाचे लक्षण”
राज्यपालांना विमान नाकारणे हे कदृपणाचे, क्षुद्रपणाचे लक्षण आहे. साधारणपणे राज्यपालांना जेव्हा प्रवासाला जायचे असते तेव्हा मुख्यमंत्री कार्यालयाकडे फाईल पाठवायची असते आणि ती तत्काळ क्लिअर करायची असते. पण ती झाली नाही, त्यामुळे राज्यपालांना खाजगी विमानाने जावे लागले, हे द्वेषाचं, सुडाचं टोक आहे, असं टीकास्त्र चंद्रकांत पाटील यांनी डागलं.
संबंधित बातम्या :
अमितभाईंच्या पायगुणाने महाराष्ट्रात सरकार यायचं असेल तर येईल : चंद्रकांत पाटील
मनसेत पक्षप्रवेशाचा धडाका, डॅशिंग नेते अशोक मुर्तडक यांच्या नेतृत्वात कृष्णकुंजवर ‘मेगाभरती’
(Chandrakant Patil reacts on BJP alliance with MNS)