मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पीएचडी करण्याची आपली इच्छा आहे, असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खोचक टोला लगावला. 50 वर्ष राजकारणात असूनही दहाच्या वर खासदार निवडून आणता आला नसल्याचा टोलाही चंद्रकांतदादांनी पवारांना (Chandrakant Patil PhD in Sharad Pawar) लगावला.
भाजपही देशावरील आपत्ती आहे, अशी टीका शरद पवार यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या निकालावर प्रतिक्रिया देताना केली होती, त्याला चंद्रकांत पाटलांनी प्रदेशाध्यक्षपदी फेरनियुक्ती झाल्यानंतर उत्तर दिलं.
“शरद पवार यांची प्रतिक्रिया फारशी गांभीर्याने घेण्याची गरज नाही. ते 50 वर्ष राजकारणात आहेत, तरीही त्यांचा पक्ष दहापेक्षा जास्त खासदार पाहू शकला नाही. मात्र राजकारणात ते कायम केंद्रबिंदू असतात. ते कसे काय?’ असा प्रश्न विचारत चंद्रकांत पाटलांनी टोमणा मारला.
‘शरद पवार एकाच वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी संवाद साधतात आणि त्यांना आपलं म्हणणं कसं काय पटवून देतात? हे प्रश्न माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत. म्हणून मला त्यांच्यावर पीएचडी करायची आहे’ असं चंद्रकांत पाटील तिरकसपणे म्हणाले.
याआधी, दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या निकालावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेखी मिरवू नये, ‘आम आदमी पक्षा’ला मिळालेल्या यशात त्यांचं काहीही योगदान नाही, अशी घणाघाती टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती. दिल्लीच्या निकालाचा टेंभा शिवसेनेनेही मिरवू नये. काँग्रेसने शरणागती पत्करली, त्यामुळे ‘आप’चा विजय झाला. शरद पवार आणि शिवसेनेने भाजपला खिजवण्याचं काम करु नये, असं चंद्रकांत पाटलांनी सुनावलं (Chandrakant Patil PhD in Sharad Pawar) होतं.