मुंबई : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज भाजप प्रदेशाध्यक्षपदाचा भार स्वीकारला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांचं अभिनंदन केलं.
यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, “गेल्या पाच वर्षात भाजपने जनतेला सुखी ठेवलं. मुख्यमंत्र्यांनी चांगलं काम केलं. आता पक्ष वाढवण्याची जबाबदारी माझ्यावर दिली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत युतीचं राज्य पुन्हा आणण्याचं काम करु. जे आतापर्यंत यश मिळालं याचं श्रेय संघटनेचं आहे”
राज्यात विधानसभेच्या 227 जागांवर आपण पुढे आहोत. युती होणार आहे. आपल्या मित्रपक्षालाही निवडून आणायचं आहे, तरच आपली सत्ता येईल, असं चंद्रकांत पाटील यांनी नमूद केलं.
शिवसेनेच्या मोर्चावर प्रतिक्रिया
“शिवसेनेने आज शेतकरी पीक विम्यासाठी विमा कंपन्यांवर मोर्चा काढला यात काही गैर नाही. सरकारचं काही चुकत असेल तर भाजप कार्यकर्त्यांनी सुद्धा मोर्चे काढावेत, प्रश्न सुटतील. पीक विम्याबाबत सरकार काम करत आहे. शिवसेनेने काढलेला मोर्चा सरकारवर नाही तर कंपन्यांवर होता”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
शिवसेनेचा मोर्चा
शेतकऱ्यांच्या पीक विम्यासाठी शिवसेनेने आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात मोर्चा काढला. शिवसेना नेत्यांनी विमा कंपन्याच्या कार्यालावर धडक मोर्चा काढला. वांद्रे कुर्ला संकुलातील विमा कंपन्यांच्या कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, मनोहर जोशी यांच्यासह शिवसेनेचे दिग्गज नेते उपस्थित होते.
संबंधित बातम्या
15 दिवसात पीक विम्याचे पैसे द्या, अन्यथा 16 व्या दिवशी… : उद्धव ठाकरे