कोल्हापूर : अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत, मात्र तेच मुख्यमंत्री असल्यासारखं वागत आहेत, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला (Chandrakant Patil Taunts Ajit Pawar). कोल्हापुरात चंद्रकांत पाटलांच्या नेतृत्वात भाजपने मोर्चा काढला. शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोवर भाजप स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही पाटील यांनी ठाकरे सरकारला दिला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत, मात्र अजित पवारच मुख्यमंत्री असल्यासारखे वागत आहेत. ते स्वतःच सगळ्या घोषणा करतात., अशा शब्दात चंद्रकांत पाटलांनी ठाकरे आणि पवार या दोघांनाही चिमटा काढला. महाविकास आघाडीने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली कर्जमाफी फसवी आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
दरम्यान, कोरेगाव भीमा हिंसाचार प्रश्नावरही चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चौकशी करायला कुणी अडवलं आहे? असा प्रतिप्रश्न त्यांनी विचारला. ‘आम्ही स्वच्छ आहोत. जी काही चौकशी करायची आहे, ती लवकर करा. या सरकारमध्ये एकमेकांचं एकमेकांवर वजन आहे. त्यामुळे त्यांचे तेच पडतील’ अशी खरमरीत टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.
भीमा कोरेगाव प्रकरणात केंद्राच्या समितीला सहकार्य केलं नाही, तर त्याचे कायदेशीर परिणाम भोगावे लागतील असा इशाराही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिला.
महाविकास आघाडीने जाहीर केलेल्या कर्जमाफीविरोधात भाजपने कोल्हापुरातील दसरा चौकातून मोर्चा काढला. चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजप ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघाला. सरसकट कर्जमाफीसह मायक्रो फायनान्सच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला.
महाविकास आघाडीने जाहीर केलेल्या कर्जमाफीतून 90 टक्के शेतकरी वंचित राहिले आहेत.जाचक अटींमुळे पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळवताना कसरत करावी लागणार आहे. सरसकट कर्जमाफी, निकषात बदल करण्यासह अन्य मागण्यांचं निवेदन चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं.
Chandrakant Patil Taunts Ajit Pawar