सोलापूर: सिंचन विभागातील घोटाळ्याप्रकरणी सध्या उच्च न्यायालयात केस दाखल असून, कोणत्याही क्षणी उच्च न्यायालयाचा निकाल येऊ शकतो, असा इशारा राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोलापुरात आयोजित पत्रकार परिषदेत दिला. अजित पवार यांच्या प्रकरणात उच्च न्यायालयाला आवश्यक ती कागदपत्रे आम्ही तत्परतेने पुरवत असून, कोणत्याही क्षणी त्याचा निकाल येण्याची शक्यता आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
भारतीय जनता पार्टीने कायद्यानुसार ज्यांच्यावर कारवाई करायची होती, त्यांच्यावर कारवाई केली. म्हणूनच छगन भुजबळ दोन वर्ष आत राहिले, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
चंद्रकांत पाटील यांनी याच पत्रकार परिषेदेत माढ्याचे राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांच्या संबंधित तीन साखर कारखान्यांची चौकशी करणार असल्याचं सांगितलं. शेतकऱ्यांच्या नावावर त्यांच्या साखर कारखान्याने पैसे उचलले आहेत. त्यामुळे त्यांची चौकशी होईल, असं पाटील म्हणाले. रत्नाकर गुट्टे यांना आत जावे लागले आहे, त्यामुळे संजय शिंदे यांच्यावरसुद्धा कारवाई होणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं.
शिवसेना आणि भाजपाची युती कधीच तुटली नाही. युती तुटली असती तर शिवसेना सरकारमधून बाहेर पडली असती. केवळ 2014 मध्ये विधानसभेच्या निवडणुकीपूर्ती युती तुटली होती. मात्र पुन्हा शिवसेना सत्तेत आली, शिवसेना बाहेर पडावी यासाठी अनेक जण देव पाण्यात ठेवून बसल्याचा उपरोधिक टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला.