पुणे : बेळगाव महापालिकेवर भाजपनं वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधलाय. राऊतांच्या या टीकेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्याचबरोबर संजय राऊत यांच्या कोथळा काढण्याच्या वक्तव्यावरुनही पाटील यांनी राऊतांना जोरदार टोला लगावलाय. ‘खोटं बोल पण रेटून बोल.. सकाळी एक बोलायचं दुपारी एक. त्यांना बहुतेक अल्झायमर सुरु झाल्याचं दिसतंय. त्यामुळे दुपारी लक्षातच राहत नाही काय बोललो. ते क्लिअर कट अस म्हणाले की आम्ही पाठीत खंजीर खुपसत नाही तर कोथळाच काढतो. ते पोलीस बघतील. पण पोलीस त्यांच्या दबावाखाली काम करत असल्यामुळे ते काय करतील माहिती नाही. पण आमच्या पुण्याच्या अध्यक्षांनी तर तक्रार दाखल केली आहे’, असं पाटील म्हणाले. (Chandrakant Patil’s reply to ShivSena MP Sanjay Raut’s criticism)
बेळगाव महापालिका निवडणुकीतील विजयानंतर पाटील यांनी शिवसेनेला थेट इशारा दिलाय. सोशल मीडियावर भाजपकडून ट्रेंड केलं जात आहे की बेळगाव तो झांकी है, मुंबई अभी बाकी है, याबाबत पाटील यांना विचारलं असता, ‘बेळगाव झांकी आहे की नाही माहिती नाही, पण मुंबई बाकी आहे’ हे तर नक्कीच आहे आणि ती सोडणार नाहीत. हैदराबादच्या वेळेलाही आम्ही म्हटलं होतं. दोन का एक नगरसेवकावरुन थेट आम्ही 51 वर गेलो. तेव्हा आम्ही म्हणलं की ज्या स्टाईलने आम्ही हैदराबाद लढलो, त्याच स्टाईलने मुंबई लढणार, असं थेट आव्हानच पाटील यांनी शिवसेनेला दिलं आहे. तसंच बेळगावात भाजपचे जे नगरसेवक निवडून आले आहेत, त्यात निम्म्यापेक्षा जास्त मराठी भाषिकच असल्याचं पाटील यांनी आवर्जुन सांगितलं.
एकीकरण समिती मराठी माणसांची प्रातिनिधीक संघटना आहे. या संघटनेचा पराभव झाला म्हणून काही लोक महाराष्ट्रात पेढे वाटत आहेत. मराठी माणूस हरल्यावर पेढे वाटता. लाज वाटत नाही, असा संताप संजय राऊत यांनी व्यक्त केला. त्यावर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राऊतांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. ‘ज्या ज्या वेळेला रिझल्ट चांगले असतात, त्यावेळेला ईव्हीएम चांगलं असतं आणि ज्या वेळी निकाल त्यांच्या विरोधात लागतात तेव्हा ईव्हीएममध्ये त्यांना घोटाळा वाटतो. हे त्यांच्या आणि विरोधकांच्या स्वभावानुसारच आहे’, असा टोला पाटील यांनी लगावलाय.
मराठी माणूस महापालिकेत सत्ता स्थापन करेल अशी खात्री होती. बेळगावमध्ये सातत्याने मराठी माणूसच निवडून आला आहे. एकीकरण समितीला केवळ तीनच जागा मिळाल्याची माहिती आहे. हे दुर्देव आहे. पण यामागे किती मोठं कारस्थान झालं असेल याची कल्पना करवत नाही. मी ईव्हीएमवर याचं खापर फोडणार नाही. कर्नाटकाच्या सरकारने मराठी माणसाचा पराभव घडवून बेळगावर मराठी माणसाचा हक्क राहू नये यासाठी काय गडबड केली त्याची माहिती बाहेर येईलच, असं राऊत म्हणाले.
इतर बातम्या :
मराठी माणूस हरल्यावर पेढे वाटता, लाज वाटत नाही, बेळगावच्या भाजपच्या विजयावर राऊतांचा संताप
मेहबूब शेख यांचं आव्हान चित्रा वाघ यांनी स्वीकारलं, म्हणाल्या, ‘मलाही दम बघायचाय’
Chandrakant Patil’s reply to ShivSena MP Sanjay Raut’s criticism