मुंबई : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirot Somaiya) यांना शनिवारी पुण्यात धक्काबुक्की करण्याचा आणि त्यांचा रस्ता अडवण्याचा प्रयत्न काही शिवसैनिकांकडून करण्यात आला. या सर्व प्रकारात सोमय्या जखमी झाले आहेत. त्यांच्या हाताला आणि कंबरेला दुखापत झाली आहे. या प्रकारावरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी शिवसेनेला इशारा दिलाय. पुण्यातील हल्ल्याचे सर्व पुरावे समोर असतानाही, कारवाई होत नाही. त्यामुळे भविष्यात सर्व हिशोब चुकते होणार, असं पाटील म्हणाले. पुण्यात ते पत्रकारांशी बोलत होते. तसेच किरीट सोमय्या हल्लाप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांना पत्र लिहून सर्व पुरावे देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, “किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ल्यात पुणे पोलिसांनी जे गुन्हे दाखल केले आहेत, ते अतिशय हास्यास्पद आहेत. या घटनेचे सर्व पुरावे उपलब्ध आहेत. पण तरीही पुणे पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद न करणं, यातून पुणे पोलिसांवर दबाव असल्याचंच सिद्ध होतं. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून घटनाक्रम कळवला असून, सर्व पुरावे दिले आहेत. तसेच या प्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली आहे.”
सोमय्यांच्या प्रकरणात पुरावे असूनसुद्धा सरकारच्या दबावामुळे पोलीस शिवसैनिकांवर कारवाई करत नाही. तसेच गावोगावी भाजपा कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यामुळे मी केंद्रीय गृहमंत्री श्री.अमितभाई शाह यांना पत्र लिहून या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे. pic.twitter.com/GSXIA0N0QG
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) February 7, 2022
त्याचबरोबर “किरीट सोमय्यांवरील हल्ल्याच्या पाठिमागे कोण आहे, ते सर्वांना माहीत आहे. ज्यांची नावे एकेका प्रकरणातून समोर येत आहेत, त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. कोणत्याहीक्षणी तपास यंत्रणा त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहेत. त्यामुळे त्यावर उत्तर देता येऊ शकत नसेल, तेव्हा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो. पण त्यांनी कितीही प्रयत्न केले, तरी आमचा आवाज दाबू शकत नाहीत,” असंही पाटील यावेळी म्हणाले.
वाझे यांना पुन्हा सेवेत घेण्यासाठी मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे यांनी दबाव आणला असा आरोप मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांनी केला आहे. त्यामुळे आगामी काळात अनेक प्रकरणात मुख्यमंत्र्यांचे नाव घेण्याचे प्रसंग येतील! pic.twitter.com/jw4uWWtyah
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) February 7, 2022
अनिल देशमुख यांच्यावरील 100 कोटींच्या आरोपानंतर माननीय उच्च न्यायालयाने दखल घेत सीबीआय चौकशीचे आदेश दिले. आता परमवीर सिंह आणि अनिल देशमुख यांच्या ईडीला दिलेल्या जबाबातून मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरेंची नावे येत आहेत. त्याची दखल माननीय उच्च न्यायालयाने घ्यावी, अशी विनंती पाटील यांनी यावेळी केली. तसंच किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ल्याचे विडंबन वृत्त सामनामधून प्रकाशित करण्याच्या कृतीवर बोलताना पाटील म्हणाले की, “सामना हा सवंग लोकप्रियतेसारखे आता गल्लीतले वृत्तपत्र झाले आहे. त्यामुळे आदरणीय रश्मी वहिनी यांनी सामनाचे संपादक पद सोडलं आहे का?” असा सवाल ही त्यांनी यावेळी उपस्थित केला. दरम्यान, किरीट सोमय्या हल्ल्यातील आरोपींना तातडीने अटक करुन, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद केला नाही. तर भारतीय जनता पक्ष उच्च न्यायालय आणि राज्यपालांकडे दाद मागणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
सामना हा आता एखाद्या गल्लीतील वर्तमानपत्राप्रमाणे झाला आहे. सामानाने कधीच आपली पायरी सोडली आहे. वर्तमानपत्रामध्ये येणाऱ्या प्रत्येक शब्दासाठी त्याचा संपादक जबाबदार असतो. त्यामुळे आम्ही वारंवार आदरणीय रश्मी वहिनींना ‘तुम्ही सामनाचं संपादक पद सोडलं आहे का?’ असा प्रश्न विचारतो ! pic.twitter.com/pMfj92Crns
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) February 7, 2022
इतर बातम्या :