जळगाव : “मेगाभरतीमुळेच भाजपने सरकार घालवले,” अशा शब्दांत भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजपला घरचा आहेर (Chandraknat patil on megabharti) दिला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पिंपरीतील कार्यक्रमात याबाबतचं वक्तव्य केलं होतं. तोच धागा पकडून खडसेंनी पुन्हा खदखद व्यक्त केली. एकनाथ खडसे जळगावातील त्यांच्या ‘मुक्ताई’ निवासस्थानी पत्रकारांसोबत बोलत (Chandraknat patil on megabharti) होते.
मेगाभरतीमध्ये जे घेतले आहेत, ते लगेच वाल्याचे वाल्मिकी होणार नाहीत. चंद्रकांतदादांनी म्हटले आहे की, “निष्ठावंतांवर अन्याय झाला आहे ही गोष्ट त्यांनी मान्य केली आहे,” असं खडसे म्हणाले.
निष्ठावंतांना डावलून अगली बार 220 पार, अशी घोषणा देत नवीन लोकांना संधी दिली, त्यांना लोकांनी हरवले. मेगाभरतीचा परिणाम निश्चितच निवडणुकीवेळी झाला आहे. आता तरी पक्ष नितीमध्ये बदल करेल, असा टोला खडसेंनी लगावला.
वंशजांकडे पुरावे मागणे दुर्दैवी : खडसे
“छत्रपतींच्या वंशजांना तुम्ही वंशज आहात का याचे पुरावे मागणं हा एक दुर्दैवी भाग आहे. पुरावे कुठे मागायचे, कोणाचे मागायचे आणि कोणावर किती विश्वास ठेवावा? संजय राऊत यांनी ते वक्तव्य करायला नको होतं,” असंही खडसे म्हणाले.
चंद्रकांत पाटील काल काय म्हणाले?
मेगाभरती सुरु झाली आणि भाजपचे कल्चर थोडे विचलित झाले, अशी थेट कबुली चंद्रकांत पाटील यांनी दिली. भाजपला विधानसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळालं नाही. तेव्हापासूनच पक्षात चलबिचल सुरु झाली होती. अन्य पक्षांतील नेत्यांना प्रवेश दिल्याने नुकसान झाल्याची कबुली चंद्रकांत पाटील यांनी दिली.
अन्य पक्षांतील नेत्यांच्या प्रवेशांमुळे पक्षात अस्वस्थता पसरली होती, पण त्याबाबत कोणीही जाहीर मत व्यक्त केलं नव्हतं. सत्ता असल्याने त्यावेळी असंतोष बाहेर पडला नाही. सत्ता गेल्यावर मात्र भाजपच्या जागा कमी होण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या वेगवेगळ्या चुकांबाबत विचारमंथन होताना आयाराम नेत्यांमुळे फटका बसल्याचा निष्कर्ष निघाल्याचं पाटलांनी सांगितलं.
चंद्रकांत पाटील आज काय म्हणाले?
दरम्यान, कालच्या या वक्तव्यानंतर चंद्रकांत पाटलांनी पत्रकार परिषद घेऊन आज त्याबाबत स्पष्टीकरण दिलं.
“मी जे बोललो त्याचा विपर्यास केला. भाजपमध्ये जे कुणी वेगवेगळ्या पक्षातून आले त्यांचा आम्हला अभिमान आहे. त्यांचा आम्हला फायदा झाला होता, आहे आणि होईल,” असं चंद्रकांत पाटील आज म्हणाले.
“उदयनराजे भोसले, संभाजीराजे, नारायण राणे, गणेश नाईक आमच्याकडे आले. हे सर्वजण आमच्या पक्षात आले, त्यांना आम्ही आमची कार्यपद्धती समजावून सांगितली आहे आणि त्यांनी ती आत्मसात केली आहे. भाजप कुणा एकट्याचा पक्ष नाही, सर्वांचा आहे. शिवसेना उद्धव ठाकरेंनंतर आदित्य ठाकरे, काँग्रेस हा गांधी परिवाराचा आहे, सपा मुलायम सिंग आणि त्यानंतर अखिलेश यांचा आहे, मात्र भाजप हा सर्वांचा पक्ष आहे” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
देवेंद्र फडणवीस निर्णय घेताना आम्हला विचारतात. सामूहिक निर्णय केला जातो. जे वेगवेगळ्या पक्षातून आले आहेत, त्यांना डायल्युशन करण्याचं काम सुरू आहे. आमच्या पक्षात जे आले ते कुठेही गेलेले नाहीत. जुन्यांना आम्ही डावललं नाही, असंही चंद्रकांत पाटील (Chandraknat patil on megabharti) म्हणाले.