चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसनं शिवसेनेला मोठा धक्का दिलाय. वरोरा नगर परिषदेतील शिवसेनेच्या 9 पैकी 7 नगरसेवकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावतीमध्ये काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला पालकमंत्री विजय वडेट्टीवार, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, खासदार बाळू धानोरकर उपस्थित होते. महत्वाची बाब म्हणजे भद्रावती पालिकेतही शिवसेनेला धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, आज फक्त वरोरा नगर परिषदेतील 7 नगरसेवकांनीच काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. (7 ShivSena corporators from Warora municipality join Congress)
गेल्या 25 वर्षांपासून भद्रावती पालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. पालिकेतील 28 सदस्यांपैकी 17 नगरसेवक काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत होते. खासदार बाळू धानोरकर यांचे बंधू अनिल धानोरकर हे भद्रावती पालिकेवर मागील दोन टर्म नगराध्यक्ष आहेत. आज पार पडलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात शिवसेनेचे 17 नगरसेवक काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु होती. मात्र, शिवसेनेचा बालेकिल्ला कोसळणार असल्याचं लक्षात येताच सेना नेतृत्व सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे.
शिवसेनेचे संपर्क प्रमुख प्रशांत कदम यांनी भद्रावतीत तळ ठोकला आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील घटकपक्षांमध्ये अंतर्गत संघर्ष टाळण्यासाठी शिवसेना नगरसेवकांचा काँग्रेस प्रवेश ऐनवेळी टळल्याचं सांगितलं जात आहे. काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांनी शिवसेनेत असताना भद्रावती नगरपालिकेवर एकहाती विजय मिळवला होता. दरम्यान, आज पार पडलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात भाजपच्या 3 नगरसेवकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. असं असलं तरी काँग्रेस कुठलिही फोडाफोड करत नसल्याचा दावा खासदार बाळू धारोरकर यांनी केलाय.
दरम्यान काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांनी केलेली ही उठाठेव शिवसेनेच्या वर्मी लागली आहे. शिवसेनेचा गड असलेल्या भद्रावती नगरपालिकेत खिंडार पाडणाऱ्या खासदारांना शिवसेनेने पुन्हा एकदा गद्दार संबोधले आहे. यापुढील सर्व निवडणुकात खासदार बाळू धानोरकर आणि त्यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांना खरा शिवसैनिक धडा शिकवेल, असा इशारा शिवसेना संपर्कप्रमुख प्रशांत जगताप यांनी दिलाय.
काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात लोकसभा निवडणुकीला उतरण्याची तयारी दर्शवली आहे. पक्षाने आदेश द्यावा, मी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून लढायला तयार आहे, असं वक्तव्य बाळू धानोरकर यांनी जानेवारीमध्ये केलं होतं. गेल्या लोकसभा निवडणुकीत तयारीसाठी फक्त 15 दिवस मिळाले होते. आता तयारीला तीन वर्षे बाकी आहेत. पक्षाने आदेश द्यावा, मी वाराणसीतून लोकसभा निवडणूक लढायला तयार आहे, असं काँग्रेस खासदार बाळू धानोरकर म्हणाले होते.
बाळू उर्फ सुरेश धानोरकर हे मूळचे काँग्रेसी नेते नाहीत. लोकसभा निवडणुकीत तिकीट मिळावं म्हणून बाळू धानोरकर यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. चंद्रपूरच्या जागेवर काँग्रेसने उमेदवार घोषित केला होता. मात्र, बाळू धानोरकरांसाठी काँग्रेसने उमेदवार बदलण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसला राज्यात केवळ एकाच जागेवर विजय मिळवता आला, ती म्हणजे चंद्रपूरची जागा.
इतर बातम्या :
पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपचं सेवा व समर्पण अभियान, विविध सेवा कार्यक्रमांचं आयोजन
7 ShivSena corporators from Warora municipality join Congress