गजानन उमाटे, नागपूरः काँग्रेसची स्थिती अधिकच वाईट होत असून 2047 पर्यंत काँग्रेसला (Congress) अच्छे दिन येणार नाहीत, असा मोठा दावा भाजप नेत्याने केलाय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी हे वक्तव्य केल्याने राजकीय (Politics) वर्तुळात खळबळ माजल्याचं चित्र आहे. नागपुरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलंय.
नाशिक आणि नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी विशेष म्हणजे काँग्रेसची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. काँग्रेसचं डुबतं जहाज असून एक दिल के टुकडे हुए हजार अशीच अवस्था असल्याची टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. नागपुरात आज त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरं दिली.
नाशिकमध्ये तांबे पिता-पुत्रांनी ऐनवेळी निर्णय बदलल्याने काँग्रेस तोंडावर आपटली तर नागपुरात तीन उमेदवारांपैकी महाविकास आघाडी कुणाला पाठिंबा देणार, यावरून संभ्रम कायम आहे. यावर प्रतिक्रिया देताना चंद्रेशेखर बावनकुळे म्हणाले, ‘ नागपूरमध्ये महाविकास आघाडीचे तीन भाग झाले…आपसात भांडत आहे…डुबतं जहाज आहे..
काँग्रेसमध्ये बुथ लेव्हलपर्यंत कोणी काम करायला तयार नाही. नेतृत्व नाही म्हणून कार्यकर्ते अस्वस्थ आहे. 2047 पर्यंत काँग्रेस पक्षाला काही चांगले दिवस नाही. हे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना समजलं आहे. त्यामुळे 30-30 वर्ष आता काँग्रेसमध्ये राहून आपलं आयुष्य खर्ची घालायचं नाहीये. तिथे गेल्यावर आजही तिच परिस्थिती आहे…
नेत्याचा मुलगा आमदार खासदाराचा खासदार ही काँग्रेसची परिस्थिती आहे. अजूनही नेते आपल्या मुलांना प्रमोट करायला कामाला लागले आहेत.त्यामुळे कार्यकर्ते अस्तित्वात नाही, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्या मुंबई दौरा आहे. यावेळी भाजप आणि शिंदे गटातर्फे मोठं शक्तिप्रदर्शन केलं जातंय. यावर प्रतिक्रिया देताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ‘
उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आहे. त्यासाठी आम्हाला शक्तीप्रदर्शनाची गरज नाही. नागपूरमध्ये मोदी आले तेव्हा नागपूरला 75 हजार कोटी रुपये मिळाले. आता मोदींच्या दौऱ्याने मुंबईच्या विकासात खूप मोठी भर पडणार आहे.
मुंबई पाण्याखाली जाते. डांबरीकरणावर पैसे खर्च होतात. संपूर्ण काँक्रिटिकरण झालं पाहिजे. मेट्रोचा प्रश्न आहे. अनेक प्रश्न आहेत. उद्याच्या दौऱ्यात महाराष्ट्राचा विकास हाच अजेंडा आहे. दुसरा काहीच अजेंडा नाही, असं त्यांनी स्पष्ट सांगितलं.