बीड : बीडच्या बशीरगंज भागात सीएए, एनआरसी आणि एनपीआरविरोधात गेल्या 28 दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. याच आंदोलनाला समर्थन दर्शवत ‘भीम आर्मी’च्या चंद्रशेखर आझाद यांनी आंदोलनाला भेट दिली. सीएए, एनपीआर लागू करु नये, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून करणार असल्याचं आझाद यांनी सांगितलं.(Chandrashekhar Azad to meet CM)
संघाच्या अंगणात सभा गाजवल्यानंतर चंद्रशेखर आझाद आता मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. सीएए, एनआरसी आणि एनपीआर विरुद्ध सुरु असलेलं हे इतिहासातील सर्वात मोठं हे आंदोलन आहे. त्याला रोखण्याची ताकद जनतेत आहे. त्यामुळे देशभक्तीचे प्रमाणपत्र देण्याची आम्हाला गरज नसल्याचं सांगत आझाद यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.
‘हळूहळू जनता जागी होत आहे. आगामी काळ ‘इन्कलाब’चा असेल. मोठ्या प्रमाणात आंदोलन होत राहील, असं सांगत आझाद यांनी संविधानाची प्रस्तावना वाचली.
आम्ही भारताचे नागरिक भारताला एक संपूर्ण, प्रभुत्वसंपन्न, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकतंत्रात्मक, गणराज्य बनवण्यासाठी आणि समस्त नागरिकांना सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, धर्म आणि उपासनेचं स्वातंत्र्य, प्रतिष्ठा, संधी प्राप्त करण्यासाठी बांधील आहोत. राष्ट्राची एकता आणि अखंडता सुनिश्चित करणारा बंधुत्वभाव वाढवण्यासाठी संकल्प घेतो, जोपर्यंत सीएए, एनआरसी, एनपीआरसारखे देशाला तोडणारे कायदे मागे घेतले जात नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही. आम्ही सर्वजण मिळून देशाच्या संविधानाची सुरक्षा राखू. देशात एकता, शांती आणि बंधूभाव राखू, अशी प्रतिज्ञा चंद्रशेखर आझाद यांनी उपस्थितांकडून वाचून घेतली.
Chandrashekhar Azad to meet CM