कोल्हापूर : संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अटकेनंतर राज्यातला सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा संघर्ष आणखी वाढत चालला आहे. यातच आता जेपी नड्डा (JP Nadda) यांच्या वक्तव्याचीही चर्चा आहे. प्रादेशिक पक्ष हे संपत आलेत, घराणेशाहीच्या पार्ट्या उरणार नाहीत. असे वक्तव्य जेपी नड्डा यांनी केले होते. यावरूनच आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जेपी नड्डा यांना लालकारलं आहे आणि शिवसेना संपवून दाखवा असं थेट आव्हान दिलंय. तर दुसरीकडे भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी जेपी नड्डा बोलले ते बरोबरच आहे. आम्ही येत्या लोकसभेत 400 जागा जिंकण्याचं टार्गेट ठेवलं आहे, असं सूचक विधान केलं आहे. त्यामुळे बावनकुळे यांच्या विधानानंतर यावर आणखी राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची दाट शक्यता आहे. तर दुसरीकडे ठाकरेंची शिवसेना आणि भाजप मधला संघर्ष दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.
महाराष्ट्रातील 16 लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्र्यांचा लोकसभा प्रवास दौरा सुरू होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज कोल्हापुरात पत्रकार परिषद घेतली. या लोकसभा मतदारसंघांचा आढावा केंद्रीय मंत्री घेणार आहेत. कोल्हापूरला केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार येणार आहेत. तर हातकणंगलेसाठी भुपेंद्र बघेल दौऱ्यावर असतील अशी माहिती ही त्यांनी दिली. तर बारामतीसाठी खास निर्मला सीतारामन यांना पाठवण्यात येणार आहे. 2024 ला 400 लोकसभा जिंकण्याचं टार्गेट भाजपने ठेवलंय. महाराष्ट्रामधील हे 16 मतदारसंघ जिंकण्याचं ध्येय ठेवून हा कार्यक्रम हाती घेतलाय. यात संघटनात्मक बैठका देखील होतील, मंत्र्यांच्या दौऱ्यामध्ये काही पक्षप्रवेशी होतील, अशीही माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलीय.
तसेच वाढत्या महागाईचा बागुलबुवा केला. जातोय मध्यमवर्गीयांवर कोणताही टॅक्स लागला नाही, असे म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. तर जेपी नड्डा हे अगदी बरोबर बोलले, आम्ही चारशे प्लस होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतोय. राज्यात आणि देशात आपला पक्ष एक नंबर असावा अशी आमची इच्छा आहेच. त्यामुळे प्रादेशिक पक्ष संपवण्याचा प्रयत्न भाजपने केला असं होत नाही. एकनाथ शिंदे यांच्याकडे 50 आमदार असतानाही त्यांना मुख्यमंत्री केलं. त्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेल्यावरच उद्धव ठाकरे यांना भाजप प्रादेशिक पक्षांना संपवतंय असं का वाटतं? असा सवालही त्यांनी केला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी दिल्लीला वारंवार जाण्याचा अर्थ फक्त मंत्रिमंडळ विस्तारासाठी नाही, असेही त्यांनी स्पष्ट केलं आहे.