योगेश बोरसे, पुणेः एरवी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि संजय राऊत यांच्याविरोधात टीका करणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. संजय राऊत (Sanjay Raut) हे जगातील सर्वात विद्वान आहेत, असं बावनकुळे म्हणाले. पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलताना बावनकुळे यांनी हे वक्तव्य केलं, पण यासोबतच राऊतांना कानपिचक्याही दिल्या. राऊत हुशार आहेत, मात्र त्यांनी सकाळी सकाळी माध्यमांसमोर येऊन बोलण्यापेक्षा राज्याच्या हितासाठी चार गोष्टी कराव्यात, असा सल्ला बावनकुळे यांनी दिला..
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ‘उद्धव ठाकरे यांच्याकडे आता फार कमी आमदार आणि खासदार राहिले आहेत. त्यामुळे उरलेल्या कार्यकर्त्यांना सांभाळून ठेवण्यासाठी त्यांना सरकार पडण्याची वक्तव्य करावी लागत आहेत.
संजय राऊतांवर बावनकुळे म्हणाले, त्यांनी सकाळचे टोमणे बंद करावेत. विरोधी पक्ष म्हणून जी जबाबदारी मिळाली आहे. ती जबाबदारी काय आहे, ती पार पाडावी. जगातल्या सर्वात विद्वानांपैकी एक संजय राऊत आहेत…..
सरकारने पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र तसेच इतर ठिकाणी चार गोष्टी काय चांगल्या केल्या पाहिजे याची यादी द्यावी, विकासाच्या दृष्टीने या पक्षाकडून चार गोष्टी अपेक्षित आहेत. आम्ही विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीस अशा सूचना करायचे.
प्रभावी आणि प्रबळ विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसनेही राज्याला अशा सूचना द्याव्यात, ज्यातून महाराष्ट्राचं भलं आहे. विरोधकांच्या सूचनांवर काम करून राज्याला न्याय देणं ही सरकारची जबाबदारी आहे.
अशा पद्धतीने काम झालं तर महाराष्ट्राला क्रमांक एकचं राज्य होण्यात अडचण नाही. महाराष्ट्राची जनता टोमणे सभा, टोमण्यांना कंटाळली आहे. यापेक्षा राज्याच्या जनतेला काय वाटतं हा प्लॅटफॉर्म तयार करावा, असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं.