मुंबई : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत (Kolhapur North By Election) काँग्रेसनं भाजपला चारीमुंड्या चीत केलंय. काँग्रेस आणि पर्यायानं महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव (Jayashree Jadhav) यांनी भाजप उमेदवार सत्यजीत कदम यांचा 18 हजार मतांनी पराभव केलाय. ही पोटनिवडणूक जरी जयश्री जाधव आणि सत्यजीत कदम यांच्यात झाली असली तरी खरा सामना हा महाविकास आघाडीतील नेते सतेज पाटील, हसन मुश्रीफ आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यात होता. मात्र, या सामन्यात आणि कोल्हापुरात चंद्रकांत पाटील यांना पुन्हा एकदा पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. त्यामुळे कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुकीतील पराभवानंतर आता चंद्रकांत पाटील यांच्या भाजप प्रदेशाध्यक्षपाच्या राजीनाम्याची चर्चा जोर धरु लागलीय!
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारात चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यांचा फटका भाजपला बसल्याची चर्चा आहे. त्यामुळे पाटील यांना आपली वक्तव्ये भोवण्याची शक्यता असल्याची चर्चा भाजप नेत्यांमध्ये सुरु असल्याचं कळतंय. कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरण्यात आला होता. मात्र, हा मुद्दा मतदारांच्या पसंतीला उतरला नसल्याचं दिसून येत आहे.
त्याबरोबर पराभव झाला तर मी हिमालयात जाईन असंही एक वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. आता कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून पाटलांची चांगलीच खिल्ली उडवली जातेय. तसंच पाटलांच्या वक्तव्यावरुन भाजपवरही टोलेबाजी केली जात आहे. इतकंच नाही तर चंद्रकांत पाटील हे महाविकास आघाडी सरकार कधी पडणार याच्या तारखाच देत आले आहेत. त्यावरुनही महाविकास आघाडीतील नेते आता भाजपवर निशाणा साधताना दिसून येत आहेत.
मुळचे कोल्हापूरचे असलेल्या चंद्रकांत पाटील यांना 2019 च्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरात भाजपला एकही जागा जिंकून देता आली नाही. महापालिका निवडणुकीतही भाजपचा मोठा पराभव झाला. गोकुळ दूध संघ निवडणुकीतही भाजपला फटका बसला. तर आता पार पडलेल्या पोडनिवडणुकीतही भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांना प्रदेशाध्यक्षपदावरुन हटवलं जाणार असल्याची चर्चा आता जोर धरताना दिसत आहे.
इतर बातम्या :